मंचर परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. नुकतीच अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या आवारात एक बिबट्या व दोन पिल्ले आढळून आली होती. जुना चांडोली रस्त्यालगत लोंढेमळा याठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आढळून येत आहे. या ठिकाणी बिबट्याने पाळीव प्राण्यावर हल्ला केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या वावराचा परिणाम शेतीतील कामावर झाला आहे. सायंकाळनंतर शेतात जाता येत नाही. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी अवसरी घाट येथील वनपरिक्षेत्राधिकारी गायकवाड यांच्यासोबत ग्रामस्थांनी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली होती. त्यानंतर सोमवारी त्यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले. मंचर शहरातील जुना चांडोली रस्ता लोंढेमळा याठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्याच्या उपद्रवामुळे जीवितहानी होण्याची शक्यता वाढली आहे.त्यामुळे त्याला तातडीने जेरबंद करण्यात यावे अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. मंचर शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष संदीप (लक्ष्मण) थोरात भकते, अमोल लोंढे, विकास बाणखेले, संतोष माशेरे, एकनाथ मुळे आदी उपस्थित होते.
२३मंचर पिंजरा
मंचर ग्रामस्थांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना पिंजरा लावण्यासाठी निवेदन दिले.