...त्यापेक्षा एखादं कोविड सेंटर उभारा; ‘राष्ट्रवादी’चा मनसेवर जोरदार पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 07:05 PM2021-04-19T19:05:00+5:302021-04-19T19:29:48+5:30

मनसेने थेट राज्यपालांनीच बारामतीत लक्ष घालण्याची मागणी पत्राद्वारे केली होती.

Set up a corona center instead of defaming Deputy Chief Minister And Baramati; MNS retaliates strongly against NCP | ...त्यापेक्षा एखादं कोविड सेंटर उभारा; ‘राष्ट्रवादी’चा मनसेवर जोरदार पलटवार

...त्यापेक्षा एखादं कोविड सेंटर उभारा; ‘राष्ट्रवादी’चा मनसेवर जोरदार पलटवार

Next

बारामती: बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेत जोरदार शाब्दिक वाकयुद्ध सुरू आहे. बारामतीत कोरोना संकट भीषण होत चालले आहे. आणि ही परिस्थिती हाताळण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे असा आरोप करत थेट राज्यपालांनीच बारामतीत लक्ष घालण्याची मागणी पत्राद्वारे मनसेने केली होती. त्याच धर्तीवर आता राष्ट्रवादीने मनसेला उपमुुख्यमंत्री व बारामतीची बदनामी करण्यापेक्षा एखादं कोविड सेंटर उभारा असा पलटवार केला आहे. 

कोरोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आम्ही सर्वजण रात्रीचा दिवस करत आहोत. युध्दपातळीवर उपचार सुविधा निर्माण करण्याचा अविरत प्रयत्न गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. त्यानंतर देखील बारामती व उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरु आहे. राज्यपालांनी लक्ष घालण्याची मागणी करत ढोल आंदोलन करण्याच्या परवानगीची मागणी कशासाठी करत आहात.त्याऐवजी बारामतीकरांसाठी एखादे तरी कोविड सेंटर उभारा,ते उभारण्यासाठी घरी येत मार्गदर्शन करण्याची तयारी आहे असा टोला ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी मनसेसह अन्य नेत्यांना लगावला आहे. रेमडेसिविर इंजेक्शन ,व्हेंटिलेटर,बेडच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने राज्यपालांनी लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर गुजर यांनी पत्रकार परिषद घेत संबंधितांना टोला लगावला आहे. सवंग लोकप्रियतेसाठी हे प्रकार सुरु आहेत,बारामतीचे नाव खराब करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा गुजर यांनी दिला. बारामतीमध्ये कोरोना रुग्णांसाठी आवश्यक सर्व उपाययोजना युध्दपातळीवर करण्यात येत आहेत.कोरोना संकट दूर  करण्यासाठी प्रशासन देखील जीव ओतुन काम करत आहे. असे असताना काहीजण सवंग लोकप्रियतेसाठी बारामतीचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी तो थांबवावा. यापूर्वी आपण विरोधकांवर कधीही बोललो नाही. मात्र, वर्षभर कोरोना निर्मूलनासाठी जीवाचे रान केले आहे. 

माझ्यासह अन्य कार्यकर्त्यांच्या घरी ज्येष्ठ मंडळी,लहान मुले आहेत.त्यानंतर देखील कोरोनाचा विचार न करता ‘रिस्क ’ घेत आमचे काम सुरुच आहे. त्या अधिकाराने आज बोलत आहे. ही बोलण्याची वेळ काहीजणांमुळे आली. समाजाचे हित न पाहता काहीजण संवंग लोकप्रियतेसाठी हे बोलत आहेत.  त्यांनी बारामतीकरांना बेडची गरज आहे,यामध्ये अडथळा ठराल तर देव सुध्दा माफ करणार नाही, असा इशारा संबधितांना गुजर यांनी दिला.

यावेळी गुजर पुढे म्हणाले, खासगी रुग्णालयात एकुण ७६७ रुग्ण दाखल आहेत.त्यापैकि ३७० रुग्ण आॅक्सिजनवर,४५ जण व्हेंटीलेटरवर आहेत.एकुण रुग्णांसाठी ७५०  रेमडेसिव्हर  इंजेक्शनची रोज मागणी आहे.त्यासाठी रुग्णाचे नाव,आॅक्सिजनचे प्रमाण,आरटीपीसीआर स्कोअर आदी माहिती असलेल्या स्वरुपाचा अर्ज तयार करण्यात आला आहे.त्याची पाहणी प्रमुख वैद्यकीय अधिकारी करणार आहेत.त्याची मंजुरी मिळाल्यानंतरच इंजेक्शन उपलब्ध होतील.या मंजुरीचे लेखापरीक्षण केले जाणार असल्याचे गुजर म्हणाले.

काय आहे प्रकरण...

बारामती शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती भीषण होत आहे. आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याने आरोग्य विषयक आणीबाणी निर्माण होवु पाहत आहे. बारामती शहरात रेमडेसिविर इंजेक्शनची भासणारी कमतरता ,रुग्णांच्या नातेवाईकांना करावी लागणारी धावपळ या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड.सुधीर पाटसकर यांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीच बारामतीत लक्ष घालावे,अशी मागणी देखील केली होती.

 

————————————————
...बारामतीत सुनेत्रा पवार तळ ठोकून 
बारामती शहरातील कोरोनाच्या परीस्थितीवर पवार कुटुंबिय लक्ष ठेवुन आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीत तळ ठोकून आहेत.कोरोनाशी लढा देताना प्रत्येक घडामोडींवर त्यांचे लक्ष आहे. राज्यात बारामतीचे नाव विकसनशील शहरामध्ये आवर्जून घेतले जाते.त्या बारामतीकरांच्या,बारामतीच्या नावाला गालबोट लागणार नाही.बारामती कोरोनामुक्त होईपर्यंत अविरत प्रयत्न,नियोजन सुरुच राहील,असे ज्येष्ठ नगरसेवक गुजर म्हणाले.
———————————————

Web Title: Set up a corona center instead of defaming Deputy Chief Minister And Baramati; MNS retaliates strongly against NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.