पुणे: SET Exam: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि महाराष्ट्रच्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) यांच्या वतीने सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी ‘राज्यस्तरीय पात्रता परीक्षा’ (सेट) रविवारी (26 सप्टेंबर) आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसह गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठीही घेण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, आणि गोवा राज्यात अशा एकूण 15 ठिकाणी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेचे एकूण 220 महाविद्यालयांमध्ये आयोजन करण्यात येणार आहे. सेट परीक्षेसाठी 98 हजार 360 विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. त्यामधील तब्बल 15 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पुणे शहर केंद्र निवडले आहे. पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील 30 महाविद्यालयांमध्ये या विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. 16 सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांना ‘http://setexam.unipune.ac.in’ या संकेतस्थळावर परीक्षेची हॉलतिकीट ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
परीक्षेदरम्यान सर्व महाविद्यालयांना कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास त्यांनी 020-25622446 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन सेटचे सदस्य सचिव आणि SPPU कुलसचिव डा. प्रफुल्ल पवार यांनी केले आहे. कोरोनामुळे यापूर्वी अनेक परीक्षा रद्द किंवा पुढे ढकलल्या होत्या.