पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी लष्कर न्यायालयात भाजप वकील आघाडी आणि लीगल जस्टीस सोसायटीतर्फे दाखल झालेले दोन्ही अर्ज शुक्रवारी (दि.5) फेटाळण्यात आले. अर्ज मंजूर करण्यासंबंधीचे कोणतेही अधिकार मला नाहीत. पोलिसांनीपूजा चव्हाणच्या आत्महत्येची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे असे सांगत न्यायाधीश रोहिणी पाटील यांनी अर्ज फेटाळला असल्याचे भाजप वकील आघाडीच्या अध्यक्ष अॅड. ईशानी जोशी यांनी सांगितले.
बावीस वर्षीय पूजा चव्हाणच्या आत्महत्येची चौकशी करावी आणि त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भाजप वकील आघाडीने न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात राजकीय व्यक्तींचा सहभाग आहे. त्यामुळे अद्याप या घटनेची सखोल चौकशी झालेली नाही. या प्रकरणात कोणाचा हात नाही, असे पोलिसही स्पष्ट करीत नाहीत. पूजा आत्महत्या प्रकरणामध्ये वानवडी पोलिसांनी तपास सुरू करावा आणि तक्रार दाखल करावी यासाठी 156 (3) या कलमाखाली भाजप वकील आघाडीतर्फे लष्कर कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यापूर्वी लीगल जस्टीस सोसायटीतर्फे अॅड. भक्ती पांढरे यांनी देखील लष्कर न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या दोन्हीही अर्जांमध्ये कोणतीही व्यक्ती किंवा संशयिताचे नाव देण्यात आलेले नव्हते. मात्र हे दोन्ही अर्ज शुक्रवारी (दि.5) फेटाळण्यात आले. आम्ही हा अर्ज फेरविचारासाठी सत्र न्यायालयात दाखल करणार आहोत, असे अॅड. ईशानी जोशी यांनी सांगितले.-------------------------------------------------लष्कर न्यायालयाने दोन्ही अर्ज फेटाळले आहेत. न्यायालयाने आमचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांना आमचा तपास योग्यदिशेने चालला असल्याचे पटले.
- नम्रता पाटील, उपायुक्त