पुणे : दौंड, इंदापूरला खडकवासला धरणातून पाणी सोडण्यासाठी पुणेकरांनी मोठा विरोध केला. यावर राजकारणही झाले. या विरोधाला न जुमानता पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. पाणी चोरी रोखण्यासाठी गस्ती पथके तैनात करण्यात आली तसेच विद्युत पंपाचे वीजजोड तोडण्यात आले. मात्र, पाटबंधारे खात्याने खडकवासला कालव्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने यातून हजारो लिटर पाणी दररोज वाया जात असल्याचे लोकमतच्या पाहणीत समोर आले आहे.दुष्काळी स्थितीमुळे दौंड, इंदापूर या तालुक्यांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी खडकवासला धरणातून पाणी सोडण्याची मागणी होत होती. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे खडकवासला धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या दोन तालुक्यांसाठी खडकवासला धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला पुण्यातील नागरिकांनी विरोध केला. सिंचन भवनात मनसे कार्यर्त्यांनी तोडफोड केली. या विरोधाला न जुमानता बुधवारी पाणी सोडण्यात आले. प्रत्येक जलसेतूमधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. खडकवासला धरण ते इंदापूरदरम्यानच्या कालव्यावर ७८ जलसेतू असून, त्या प्रत्येकातून होणाऱ्या कमीजास्त गळतीची गणना केली, तर हे प्रमाण संभाव्य पाणीचोरीपेक्षा किती तरी पटींनी अधिक आहे. एकीकडे पाण्याची चोरी होऊ नये म्हणून वीजपुरवठा खंडित करायचा व गस्तीपथक नेमायचे, तर दुसरीकडे पाण्याची गळती होऊ नये म्हणून काळजी घ्यायची नाही. हा विरोधाभास असून त्यामुळे केवळ वीजपुरवठा नसल्याने नगदी पिकांना पाणी देता येत नाही, हा आपल्यांवर अन्याय होत आहे, असा आरोप कालवा परिसरातील शेतक-यांनी केला आहे.कोणावर गुन्हे दाखल करणार ?खडकवासला धरणातून सोडण्यात आलेले पाणी हे फक्त पिण्यासाठी राखीव असल्याचा कांगावा करण्यात आला. पाण्याची चोरी होऊ नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तसेच शासकीय अधिकारी यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. मात्र, अशा प्रकारे पाणी वाया जाण्याऐवजी शेतीला गेले असते, तर काय बिघडले असते? किंवा एखाद्या शेतकऱ्याने पाणी चोरले तर त्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहेत. मात्र, अशा प्रकारे वितरिकेच्या नादुरुस्तीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले, आता कोणावर गुन्हे दाखल होणार? असा संतप्त सवाल ग्रामस्थ करीत आहेत.1पाणीचोरी होऊ नये, यासाठी पाटबंधारे अधिकारी आणि खडकवासला पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता बी. बी. लोहार यांनी पोलिसांच्या उपस्थितीत बैठक घेतली. पाणी चोरणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके तसेच गस्ती पथके तैनात करण्या आली. कालव्यामधून वाहणाऱ्या पाण्याच्या संरक्षणासाठी कालव्यावर ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या २०२ किलोमीटर अंतरावरील कालव्यावर सशस्त्र कमांडो पथके, तब्बल २०० पोलीस व ५ पोलीस आधिकारी तैनात केले आहेत. 2बंदोबस्त असल्याने शेतकरी पाणी उचलण्याचे धाडस करीत नाहीत; परंतु पाणी सोडण्यापूर्वी पाटबंधारे खात्याने कालव्यावर असलेल्या जलसेतूंची दुरुस्ती केलेली नसल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. यामुळे उन्हाळ्यात कोरडे पडलेले दुथडी भरून वाहत आहेत.3या आवर्तनाद्वारे १३ मेपर्यंत सुरू राहणाऱ्या दौंड, इंदापूर या तालुक्यांतील जलस्रोत भरण्यात येणार आहेत. चोख बंदोबस्तामुळे पाणी कोणी चोरणार नाही; पण गळतीमुळे मात्र हजारो लिटर पाणी ऐन दुष्काळात वाया जात आहे. कालवा दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी मिळतो, त्यानुसार प्राधान्याने गळतीच्या ठिकाणांची दुरुस्ती करण्यात येते. पाणी सोडल्यावरच गळतीचे ठिकाण कळते. शासनाकडून निधी आल्यानंतर प्राधान्याने कालव्याची दुरुस्ती करण्यात येईल.- बी. बी. लोहार मुख्य कार्यकारी खडकवासला पाटबंधारे विभाग
बंदोबस्त चोख; पण गळतीकडे दुर्लक्ष
By admin | Published: May 08, 2016 3:25 AM