पुणे : व्यापारी चंदन कृपालदास शेवानी यांचे अपहरण करून त्यांना दोन कोटींची खंडणी मागून ती देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना सातार्यातील लोणंद येथे नेऊन गोळ्या झाडून खून करण्यात आला. आता या गुन्ह्यातील सात संशयीत आरोपींवर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्यात आली आहे. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युनिट 2 चे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्याकडे गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला होता. अपर पोलिस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्या नेतृत्वात गुन्ह्याचा शोध घेऊन आफ्रिदी रौफ खान (23, रा. नाना पेठ), सुनील नामदेव गायकवाड (49, रा. शिवनेरीनगर, कोंढवा), अजिंक्य हनुमंत धुमाळ (21, ब्राम्हण आळी, सासवड), किरण सुनिल कदम (21, रा. मालगाव, ता. जि. सातारा), प्रितम रमेश आंबरे (36, रा. पुण्यनगरी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, बिबवेवाडी), परवेझ हनिफ शेख (42, रा. गंगानगर, अष्टविनायक कॉलनी, हडपसर), अनिल सुरेश सपकाळ (48, रा. वेणु लक्ष्मण अपार्टमेंट, शुक्रवारपेठ) यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे केलेले तपासात त्यांच्याकडून देशी बनावटीची आठ पिस्तुले, 58 जिवंत काडतुसे, पाच मॅगझीन, आठ मोबाईल, गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत. यापूर्वी त्यांच्यावर खून, अपहरण, संगणमताने खंडणीसाठी खून व पिस्तुल बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यांच्यावर मोका नुसार कारवाई करण्यात आली आहे.
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील ‘शिवकला’ या चप्पल दुकानाचे मालक चंदन कृपालदास शेवानी हे 4 जानेवारीच्या रात्री साडे दहाच्या सुमारास दुकान बंद करून मंडईजवळील स्वामी समर्थ मठात गेले होते तेथुन ते आपल्या कारमधून त्यांंचे घरी जात होते. शेवानी हे संगम पार्क, मालधक्का चौक समोरून जात असताना त्यावेळी अज्ञात इसमांंनी दोन कोटीच्या खंडणीसाठी त्यांचे अपहरण केले. शेवानी यांना त्यांच्या कुटुंबियांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या कुटुंबियांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पाच जानेवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुणे व सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या नीरा गावापासून सुमारे तीन कि.मी. असलेल्या सातारा जिल्ह्यातील पाडेगांंव (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील नीरा उजवा कालव्याजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती गावकर्यांनी लोणंद पोलिसांना दिली. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी अज्ञात इसमांनी चंदन शेवानी यांचा मृतदेह सातारा जिल्ह्यातील पाडेगांव (ता.खंडाळा) गावातून वाहत असलेल्या नीरा उजव्या कालव्याच्या कडेला निर्जन ठिकाणी टाकून दिला. याबाबत चंदन शेवानी यांचे बंधू गोविंद कृपालदास शेवानी (वय-57, रा. वानवडी, पुणे-40) फिर्याद दिली होती. दरम्यान गुन्ह्याचा तपास करताना सात जणांना पोलिसांनी अटक केली. पोलिस निरीक्षक महेद्र जगताप यांनी गुन्ह्याचा तपास केला. गुन्ह्याचा तपास करत असताना सातारा पोलिसांचीही मदत झाली.
पोलिस उपायुक्त बच्चन सिंग आणि सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजीपवार यांनी दिलेल्या सुचनेनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. तपासा दरम्यान परवेझ शेख याने पुणे, सातारा, सांगली परिसरात गुन्हेगारी टोळी निर्माण केल्याचे निष्पन्न झाले. त्या टोळीच्या साह्याने परिसरात दहशत निर्माण करून पुणे, सतारा, सांगली जिल्ह्यात तसेच इतर ठिकाणी आर्थिक फायद्यासाठी गंभीर स्वरूपाचे खुनाचे, जबरी चोरीचे, दरोड्याचे गुन्हे केलेले आहेत. त्याने गुन्हे करताना घातक शस्त्राचा वापर केल्याचेही निष्पन्न झाले आहे. परवेझने सहआरोपींची टोळी बनवून स्वतःचे व टोळी सदस्याच्या आर्थिक फायद्यासाठी तसेच टोळीचे वर्चस्व सिध्द करण्यासाठी गुन्हा केल्याचे दिसून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.