राजगुरूनगर : येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीमध्ये दोन कोटी ९६ लाखांची वसुली झाली. तसेच ७ हजार आठशे ४४ खटले निकाली निघाले. लोकन्यायालयात एकूण तीन हजार ९०३ खटले तडजोडीसाठी ठेवले होते. त्यापैकी ४११ खटल्यांत तडजोड होऊन एकूण एक कोटी ८७ हजार लाख ५४ हजार ६७० इतक्या रक्कमेच्या तडजोडी झाल्या. तसेच दाखल पूर्व १२ हजार ७५१ इतके खटले ठेवले होते. त्यापैकी सात हजार ४५१ खटल्यांत एक कोटी आठ लाख, ८५ हजार ४५४ इतक्या रकमेची वसुली झाली.
लोकन्यायालयाचे उद्घाटन राजगुरूनगर न्यायालयातील मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. देवीदास शिंदे-पाटील यांचे हस्ते झाले. या वेळी राजगुरूनगर न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कष्यप, एस. एन. पाटील, दिवाणी न्यायाधीश एस. एस. पाखले, के. एच. पाटील, जी. बी. देशमुख., दिवाणी न्यायाधीश आर. डी. पतंगे, डी. बी. पतंगे, पी. ए. जगदाळे. एन.एस. कदम आदी उपस्थित हाेते. यावेळी वकील सभासद व पक्षकार हजर होते. लोकन्यायालयात पॅनल ॲड. म्हणून ॲड. दीपक चौधरी, विजय रेटवडे, रमेश गोकुळे, संतोष माळी, स्मिता शिंदे, रोहिणी करंडे, सारिका उमाप, सरिता काजळे यांनी काम पाहिले.
चर्चेविना कोणताही वाद अथवा प्रश्न सोडवणे अशक्य आहे. पक्षकारांनी त्यांची इच्छाशक्ती दाखवल्यास कोणताही वाद हा आपआपसात समजुतीने मिटू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त पक्षकारांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले वाद एकत्र बसून, चर्चा करून लोकन्यायालयाच्या माध्यमातून मिटवावे, असे आवाहन मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांनी पक्षकारांना केले.
किरकोळ कारणांवरून होणारी भांडणे अनेक वर्षे कोर्टात प्रलंबित राहिलेल्या दोन्ही पक्षकारांना आर्थिक व मानसिक नुकसान होते. त्यामुळे सर्वांनी एक पाऊल पुढे टाकल्यास सर्व वाद सामोपचाराने मिटून पक्षकारांचा होणारा खर्च, मानसिक त्रास, खटल्यांची संख्या कमी होऊन प्रत्येकास लवकर न्याय मिळेल असे देवीदास शिंदे यांनी सांगितले.