पुणे : पुणे व शहर परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील टेमघर धरणाच्या दुरुस्तीच्या कामाला कोरोनामुळे पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. सध्या धरणाच्या डागडुजीचे काम ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी पुढील वर्षी उजाडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच यंदा चांगला पाऊस पडूनही गेल्या वर्षीपेक्षा यंदा धरण प्रकल्पात केवळ १ टीएमसी अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे लागणार आहे.
पुणे महापालिका कार्यक्षेत्र व ग्रामीण भागातील शेतीसाठी खडकवासला धरण प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. त्यातील टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम सुमारे तीन वर्षांपासून सुरू आहे. परंतु, अद्याप विविध कारणांमुळे ते पूर्ण होऊ शकले नाही. दुरुस्तीच्या कामासाठी टेमघर धरणातील साठा इतर धरणांमध्ये सोडला जातो. त्यामुळे सध्या टेमघर धरणात केवळ ०.४५ टीएमसी एवढाच साठा शिल्लक आहे.
पुणे महापालिकेला मंजूर पाण्यापेक्षा अधिक पाणी द्यावे लागते, अशी ओरड जलसंपदा विभागाकडून वारंवार केली जाते. त्यातच २० फेब्रुवारी ते १८ एप्रिल या कालावधीत धरणातील साडेसात टीएमसी पाणी शेतीसाठी व पिण्यासाठी वापरले आहे. धरणातून २० फेब्रुवारी रोजी शेतीसाठी कालव्याद्वारे पाणी सोडले. आणखी काही दिवस कालवा सुरूच राहणार आहे. आहे. तसेच दहा दिवसांच्या विश्रांती नंतर पुन्हा एकदा शेतीसाठी एक आवर्तन सोडले जाणार आहे. परिणामी धरणातील साठा आणखीनच कमी होणार आहे.
मागील वर्षी खडकवासला धरण प्रकल्पात १२.७६ टीएमसी एवढाच साठा शिल्लक होता. तर सध्या १३.८६ टीएमसी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे सर्वांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
--
खडकवासला धरण प्रकल्पातील दोन वर्षांची पाणी साठ्याची आकडेवारी (टीएमसी)
धरण २०२१ २०२०
खडकवासला ०.३६ ०.९७
वरसगाव ६.५४ ५.७०
पानशेत ६.६० ६.१४
टेमघर ०.४५ ०.००
--
खडकवासला धरण प्रकल्पातून शेतीसाठी २० फेब्रुवारी २०२१ रोजी पाणी सोडले. त्यावेळी धरण प्रकल्पात २१.२९ टीएमसी एवढा पाणी साठा उपलब्ध होता. रविवारी (दि.१८) धरण प्रकल्पात १३.८६ पाणी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे धरणातील तब्बल ७.४३ टीएमसी पाणी अवघ्या दोन महिन्यांत कमी झाले आहे.
---
‘टेमघर’च्या दुरुस्तीचे ८० टक्के काम पूर्ण
टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून कोरोनामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळा येत आहे. काही दिवसांपूर्वी फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून सर्व कामगार दुरुस्तीचे काम करत होते. मात्र, हे कामगार परराज्यातील असल्यामुळे ते पुन्हा गावी परतू लागले आहेत. त्यामुळे डागडुजीच्या कामाला अडथळे येत आहेत. जून महिन्यापूर्वी दुरुस्तीचे काम पूर्ण होऊ शकले नाही तर टेमघरच्या दुरुस्तीला पुढील वर्ष उजाडणार आहे.