लोणी काळभोर : कदमवाकस्ती हद्दीतील पेट्रोलजन्य पदार्थ चोरीच्या अड्ड्यावर छापा टाकुन पोलीसांनी दोन टँकरसह ८० लाखांचा ऐवज जप्त केला आहे. यामध्ये अड्ड्याच्या मालकासह सात जणांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
या कारवाईत धिरज विठ्ठल काळभोर (वय ३६, रा. कदमवाकवस्ती ता हवेली), अमिर मलिक शेख (वय ३२, रा. कदमवाकवस्ती, मुळ गाव मु. पो पिंपळे (आर) ता. बार्शी जि सोलापुर), सचिन भाऊराव सुरवसे (वय ३०, रा. सिद्राममळा, लोणीकाळभोर. मुळ रा. भाळवणी, जेऊर, ता करमाळा), विजय मारुती जगताप (वय ५२, अंबरनाथ मंदीराजवळ, लोणी काळभोर.), रामचंद्र रावसाहेब देवकाते (वय ४१, रा. संभाजी नगर, कदमवाकवस्ती), धिरज विठ्ठल काळभोर (वय ३६, रा. कदमवाकवस्ती), इसाक इस्माइल मजकुरी (वय ४२, रा. संभाजी नगर ताराहाइट्स बी ४०४, कदमवाकवस्ती) यांच्यासमवेत इंधन चोरीसाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल महेश बबन काळभोर (वय ४२, रा. कदमवाकवस्ती) यांना पोलीसांनी अटक केली आहे. पोलीस शिपाई बाजीराव वीर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत भारत टायर्स या दुकानाच्या पाठीमागे दोन टॅकरमधुन पाच ते सहा जण टॅंकरमधुन इंधन काढत असल्याची माहिती चव्हाण यांना मिळाली होती. याची खातरजमा करण्यासाठी वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे व सहायक पोलीस निरीक्षक अमित गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पोलीसांना धिरज काळभोर व त्याचे सहकारी इंडीयन ऑईल कंपणीच्या दोन टॅंकरमधून चोरुन तसेच धोकादायक पध्दतीने पेट्रोल व डिझेल काढत असल्याचे आढळुन आले. यावेळी सदर ठिकाणी पोलीसांना इंधनाने भरलेले दोन टँकर क्रमांक एमएच १२ आरएन ४६९९ व एमएच १२ आरएन ५४५१ यासह, ७ मोबाईल फोन, लोखंडी सळई, चोरलेले इंधन असा ७९ लाख ५१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.