पुणे : लहान मुलांमध्ये खाद्यपदार्थांतून होणारा संसर्ग, अस्वच्छता, गोड पदार्थांचे जास्त सेवन आदी कारणांमुळे पोटात जंत होतात. जंतदोषामुळे मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जिल्हा स्तरावर वर्षातून दोनदा शाळांमध्ये जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाते. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने जिल्ह्यात २१ ते २८ सप्टेंबर या कालावधीत गोळ्या वाटप मोहीम हाती घेण्यात आली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वर्षे वयोगटातील जवळपास ६८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमिदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतामुळे होतो. जगात २८ टक्के बालकांना आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परजीवी जंतापासून असा कृमिदोष होण्याची शक्यता आहे. याच कृमिदोषाचे महाराष्ट्रात २८ टक्के रुग्ण आढळतात. त्यामुळे शाळा बंद असल्या तरी घरोघरी जंतनाशक गोळ्या मुलांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
राष्ट्रीय जंतनाशक दिन हा कार्यक्रम मुले व पौगंडावस्थेतील मुला-मुलींसाठी जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरू करण्यात आला. राष्ट्रीय जंतनाशक दिन (एनडीडी) हा कार्यक्रम फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये एकाच निश्चित दिवशी जंतनाशक गोळ्या देऊन दोनदा घेण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन जंतनाशक मोहिमेमधील अंतर ६ महिन्यांपेक्षा जास्त नसावे. म्हणूनच जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम सप्टेंबर २०२१ मध्ये आयोजित करण्यात येत आहे.
------
पुणे जिल्ह्यामध्ये १० लाख ५२ हजार २५३ लाभार्थी आहेत. लाभार्थी मुलांपर्यंत गोळ्या पोहोचविण्यासाठी २१ ते २८ सप्टेंबर या कालावधीत कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. आशा सेविकांमार्फत गोळ्या वाटप केले जाणार आहे. शाळा आणि अंगणवाड्यांमार्फत गावस्तरावर समूह तयार करून वाटप केले जाणार आहे.
- भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी