पुणे : अंदाजपत्रकातील घट कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने मिळकत कर विभागावर सगळी जबाबदारी टाकली आहे. जप्तीच्या कारवाईचा, बँड वाजवण्याचा इशारा देत या विभागाच्या पथकाने ७ दिवसांतच १० कोटी रुपयांची वसुली केली आहे. १ हजार ४०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठण्याकरिता प्रशासनाची धडपड सुरू आहे.आर्थिक वर्ष संपण्यासाठी दोनच महिने शिल्लक असताना अंदाजपत्रकात तब्बल १ हजार ७०० कोटी रुपयांची तूट दिसून येत आहे. ती भरून काढण्याची सर्वाधिक जबाबदारी मिळकत कर विभागावर सोपविण्यात आली आहे. त्यांना यावर्षी १ हजार ४०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात आता फक्त दोन महिने शिल्लक राहिलेले असताना त्यांच्याकडून ९०९ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यात त्वरित वाढ करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी थकबाकीदारांच्या विरोधात मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे या विभागाने क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथके स्थापन केली असून त्यांच्याजवळ लाखाच्या पुढील थकबाकीदारांची यादीच दिली आहे. संबंधितांना नोटीस बजावणे व त्यानंतर त्या थकबाकीराकडे जाऊन जप्तीची कारवाई सुरू करणे, त्याच्या दारासमोर बँड वाजवणे अशी कारवाई करण्यास पथकाला सांगण्यात आले आहे. ही कारवाई टाळण्याच्या उद्देशाने थकबाकीदार पैसे जमा करीत आहेत. त्यामुळे ७ दिवसांतच १० कोटी ७७ लाख रुपयांची वसुली झाली आहे.मिळकत कर विभागाचे उपायुक्त विलास कानडे यांनी सांगितले, की प्रत्येक परिमंडलात कारवाई सुरू आहे. मंगळवारी एका दिवसात सर्व विभागांनी मिळून ३८ लाख २१ हजार रुपयांची वसुली केली असल्याची माहिती त्यांनी दिली. १ लाख व त्यापुढे थकबाकी असणाºया सर्वच थकबाकीदारांवर महापालिकेच्या वतीने कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई टाळायची असेल तर त्वरित थकबाकीजमा करावी, काही अडचणी असतील तर मिळकत कर विभाग कार्यालयाबरोबर संपर्क साधावा, असे आवाहन कानडे यांनी केले आहे.
सात दिवसांत दहा कोटींची वसुली, घट कमी करणार : जप्तीची कारवाई करण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 5:56 AM