इंदापूर : तलाठी संघटनेने अतिरिक्त कार्यभार असलेल्या ७ सजांचे कामकाज बंद ठेवल्याने त्या सजांतील १८ गावांमधील महसूलविषयक कामकाज ३ दिवसांपासून ठप्प झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाल्याचे चित्र आहे.हिंगणगाव, कांदलगाव, न्हावी, कळाशी, निंबोडी, गोतोंडी, सराटी अशी या सजांची नावे आहेत. सजांच्या गावासहित सजात अंतर्भूत असणाऱ्या बाभूळगाव, शहा, तरटगाव, चांडगाव, गंगावळण, अगोती नं. १ व २, लाकडी, गोंदी, ओझरे, लुमेवाडी या गावांमधील तलाठी कार्यालयांचा पदभार व किल्ल्या दि. १५ आॅक्टोबर रोजी तहसीलदारांकडे सुपूर्त करण्यात आल्या आहेत. या मागण्यांकरिता २६ ते २९ एप्रिलदरम्यान तलाठी संघटनेने आंदोलन केले होते. दिवाळीपूर्वी नवे सजे व महसूल मंडळे कार्यान्वित करण्यात येतील. सात-बारा संगणकीकरणाबाबत सर्व्हरसह सर्व त्रुटी एका महिन्याच्या आत दूर करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते, अशी माहिती भिसे यांनी दिली.मुख्यमंत्र्यांनीही या संदर्भात महत्त्वाचे आदेश दिले होते. मात्र, मंत्रिमंडळासमोर हे मुद्दे आले नाहीत. सात-बारा संगणकीकरणाबाबत महसूल विभागनिहाय सर्व्हर देण्यात येतील, ही मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेत विरली आहे. त्याबरोबरच, दि. ३१ आॅक्टोबरअखेर राज्यात नवे सजे, महसूल मंडळे निर्माण होणार नाहीत, अशी आमची धारणा झाल्याने हे आंदोलनात्मक पाऊल आम्ही उचलले आहे. शासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष केले, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असे भिसे व वानखेडे यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)काय आहेत मागण्या- संगणकीकरणाचे काम सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळातच करण्यात यावे. - सुटीच्या दिवशी काम सोपवण्यात येऊ नये, अतिरिक्त तलाठी सजांचा कार्यभार दि. १५ आॅक्टोबरपर्यंत तहसील कार्यालयाकडे सुपूर्त करण्यात यावा. - जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे दिलेल्या अहवालानुसार स्थापित केलेल्या कार्यस्थळी तलाठी व मंडलाधिकारी काम करतील, तशी सुविधा नसेल, तर त्या आशयाचा साप्ताहिक अहवाल तहसीलदारांना देण्यात येईल.- गौण खनिजांसंदर्भात तलाठी व मंडलाधिकारी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणार नाही.
इंदापूर तालुक्यातील सात सजांचे काम बंद
By admin | Published: October 21, 2016 4:43 AM