पुणे : स्वाईन फ्लूने मागील तेवीस दिवसांत आणखी सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरातील एकुण मृतांचा आकडा दहावर गेला आहे. तर शनिवारपर्यंत ३१ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत. आॅगस्ट महिन्यात स्वाईन फ्लुने तीन महिलांचा बळी घेतला आहे. शहरात आॅगस्ट महिन्यापासून स्वाईन फ्लु बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आॅगस्ट महिन्यापर्यंत स्वाईन फ्लुने एकही रुग्ण दगावला नव्हता. मात्र, आॅगस्ट महिन्यात तीन महिलांना प्राण गमवावे लागले. त्यातील एक महिला उस्मानाबाद येथील तर दोन पुण्यातील होत्या. सप्टेंबर महिन्यातही स्वाईन फ्लुच्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. तसेच या आजाराची तीव्रताही वाढत चालली आहे. दि. २१ आॅगस्ट रोजी स्वाईन फ्लुने तिसरा बळी गेला होता. त्यानंतर शुक्रवार (दि. १४) अखेरपर्यंत आणखी सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तेवीस दिवसांतच सात रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहरातील स्वाईन फ्लुचा फैलाव वेगाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ३ हजार ८५२ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९९ रुग्णांना टॅमी फ्लु गोळ््या देण्यात आल्या असून ६ जणांचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. शनिवारी ३ रुग्णांना स्वाईन फ्लु झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या विविध रुग्णालयांमध्ये ८५ जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी ३१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. दि. १ जानेवारीपासून आतापर्यंत ६ लाख ३० हजार ४४९ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ७ हजार ३४७ जणांना टॅमी फ्लु गोळ््या देण्यात आल्या. प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात आलेल्या १ हजार १६२ नमुन्यांपैकी १७५ जण स्वाईन फ्लुने बाधित होते. आतापर्यंत ६३ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
गेल्या २३ दिवसांत सात जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 3:25 PM
तेवीस दिवसांतच सात रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहरातील स्वाईन फ्लुचा फैलाव वेगाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठळक मुद्देशनिवारी ३ हजार ८५२ संशयित रुग्णांची तपासणी सध्या विविध रुग्णालयांमध्ये ८५ जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी ३१ रुग्ण व्हेंटिलेटरवर१ जानेवारीपासून आतापर्यंत ६ लाख ३० हजार ४४९ संशयित रुग्णांची तपासणी