वाकड : थेरगावात कैलासनगर आणि दगडू पाटीलनगर भागात धुडगूस घालणाऱ्या दोन टोळ्यांमधील आरोपींविरोधात वाकड पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या असून, दोन्ही गटांतील सात जणांना अटक केली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. या घटनेत सुमारे २२ वाहनांची तोडफोड करून सुमारे ९५ हजारांचे नुकसान झाले आहे. वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष ऊर्फ सोनू विजय गोयर (वय २१, रा. थेरगाव), गौतम गुलाब दळवी (वय १९, हिंजवडी),ऋषीकेश महादेव चव्हाण (वय १९,थेरगाव), गणेश सुरेश गेजेगे (वय २२,थेरगाव) या चार आरोपींना अटक करण्यात आली. भावड्या ऊर्फ प्रवीण हिरामण खरात (तापकीरनगर, काळेवाडी) या आरोपीसह चार अल्पवयीन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी महिलेच्या घराजवळ दगडू पाटीलनगरमध्ये शुक्रवारी रात्री दगड,विटा; तसेच काठ्या, कोयते घेऊन काहीजण जमले. त्यांनी फिर्यादी महिलेच्या घरासह आजूबाजूच्या घरांवर दगडफेक केली. एकाने महिलेला जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयता फेकून मारला. कोयत्याचा वार त्या महिलेने हुकविल्याने इजा झाली नाही. तसेच दुसरी फिर्याद पवन खलसे (वय २३, कैलासनगर, थेरगाव) याने दाखल केली असून, या फिर्यादीमुळे सचिन वसंत खलसे (वय २३, बापुजीनगर, थेरगाव), ईश्वर किसन गायकवाड (वय २५, जगतापनगर, थेरगाव) या दोन आरोपींना अटक केली आहे; तर तीन आरोपी फरार आहेत. फिर्यादी पवन खलसे मोटारीत ठेवलेला लॅपटॉप घेण्यास गेले. त्या वेळी आरोपींनी दुचाकीवर येऊन त्या ठिकाणी दगडफेक केली. वाहनांचे नुकसान केले. (वार्ताहर)>इजा पोहोचविण्याच्या उद्देशाने आरोपींनी एक दगड फिर्यादीच्या दिशेने फेकला. तो जवळ उभ्या असलेल्या मोटारीवर पडला. कैलासनगर, तसेच तापकीरनगर भागात रस्त्यावर उभ्या केलेल्या १४ वाहनांच्या काचा फोडल्या. सुमारे ६० ते ६५ हजारांचे नुकसान केले. त्या ठिकाणी उभे असलेले प्रत्यक्षदर्शी किशोर तायडे यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने तलवार मारली. तलवारीचा वार चुकविल्याने ते बचावले. दोन्ही गटांतील आरोपींवर भारतीय दंडसंहिता, तसेच मुंबई पोलीस अधिनियम आणि आर्म अॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये बेकायदा जमाव जमविणे, प्राणघातक हल्ला करणे, मालमत्तेचे नुकसान आणि बेकायदा शस्त्र बाळगणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
वाहन तोडफोडप्रकरणी सात जण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2016 1:58 AM