आळंदी : पिंपरी - चिंचवड गुन्हे शाखेने तीन कारवाया करत सात पिस्टल आणि नऊ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी रविवारी (दि. २९) सहा जणांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट चारने दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चऱ्होली फाट्याजवळ शनिवारी (दि. २८) रात्री अकरा वाजता कारवाई केली. त्यात अक्षय रवी पाखरे (वय २२, रा. म्हाळुंगे इंगळे), प्रवीण भारत म्हस्के (वय २०, रा. पिंपळे सौदागर) यांना अटक करत त्यांच्याकडून एक लाख चार हजारांच्या दोन देशी बनावटीचे पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. दरोडा विरोधी पथकाने आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (दि. २८) रात्री अकरा वाजता कारवाई करून तिघांना अटक केली. रामदास सुरेश सुकळे (वय ३९, रा. सरदार चौक, खेड), रियाज हुसेन शेख (वय २२ रा. पडाळी, ता. खेड), तुषार उर्फ डेल्या शांताराम टेके (वय २४, रा. वडगाव काशिंबे, ता. आंबेगाव) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १ लाख ७७ हजार ५१० रुपये किमतीच्या चार पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तर गुन्हे शाखा युनिट चारने दुसरी कारवाई वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेख वस्ती येथे रविवारी (दि. २९) पहाटे सव्वाचार वाजता केली. तुषार महिपती मगर (वय २४, रा. शेडगेवस्ती, वाकड) याला अटक केली असून त्याच्याकडून पोलिसांनी ५० हजारांचे एक देशी बनावटीचे पिस्टल जप्त केले आहे.
पोलिसांच्या तीन कारवाईमध्ये सात पिस्टल व नऊ जिवंत काडतुसे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2023 6:07 PM