--
लोणी काळभोर : यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत हवेली तालुक्यातील सात मेंढपाळ बांधवांची प्रकरणे मंजूर झाली असून त्यापैकी दोघांना प्रत्यक्षात मेंढ्या मिळाल्या असून उर्वरित मेंढपाळांना लवकरच मेंढ्या मिळतील, अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे हवेली तालुका अध्यक्ष भरत गडदे यांनी दिली.
यशवंतराव होळकर महामेष योजने अंतर्गत युवराज रूपनर व मोहन खताळ या दोन मेंढपाळ बांधवांना मेंढ्या वितरित करण्यात आल्या. यावेळी भरत गडदे बोलत होते. यावेळी सुरेश गडदे, पांडुरंग गडदे, भीवा कऱ्हे, शामराव चोरामले, मोहन खताळ, युवराज रूपनर, दीपक कोकरे, नीलेश रूपनर व इतर समाजबांधव उपस्थित होते.
गडदे म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सुरू केलेल्या यशवंतराव होळकर महामेष योजनेचे अर्ज हवेली तालुक्यातील काही मेंढपाळ बांधवांनी भरून दिले होते. त्यापैकी हवेली तालुक्यातील सात मेंढपाळ बांधवांची प्रकरणे मंजूर झाली आहेत. युवराज रूपनर व मोहन खताळ या दोन मेंढपाळ बांधवांना प्रत्यक्षात मेंढ्या मिळालेल्या आहेत. उर्वरित पाच प्रकरणांचा पाठपुरावा करून काही दिवसात त्या पाचही मेंढपाळ बांधवांना मेंढ्या मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
समाजबांधवांनी आवश्यक कागदपत्रे व विविध दाखले काढून ठेवावेत. येणाऱ्या काळात आम्ही या २२ योजनांचा तुम्हाला लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू. मेंढपाळ समाजबांधवांना ब-याच अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे आम्ही मेंढपाळ बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.