पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने मागील अकरा महिन्यांत तब्बल १ लाख ३८ हजार फुकट्या प्रवाशांना पकडले आहे. त्यांच्याकडून ७ कोटी ४८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.रेल्वेकडून सातत्याने विनातिकीट प्रवासी किंवा विनानोंदणी सामानाची ने-आण करणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाते. त्यासाठी स्वतंत्र पथके तयार केली जातात. पुणे विभागामध्ये पुणे मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज व मिरज-कोल्हापूर या मार्गांवर विविध रेल्वेगाड्या तसेच फलाटांवर ही कारवाई होते. एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या अकरा महिन्यांच्या कालावधीत करण्यात आलेल्या तिकीट तपासणीमध्ये एकूण ३ लाख ४ हजार प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून एकूण १४ कोटी ७० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मागील वर्षी याच कालावधीत एकूण २ लाख ६१ हजार प्रकरणांमध्ये १३ कोटी ५६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. यामध्ये विनातिकीट प्रवाशांसह फलाट तिकीट नसणे, विनानोंदणी सामान नेणाऱ्या प्रवाशांचाही समावेश आहे.कारवाई करण्यात आलेल्या एकूण प्रवाशांपैकी १ लाख ३८ हजार विनातिकीट प्रवासी पकडण्यात आले आहेत. त्यांच्याकडून ७ कोटी ४८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विनातिकीट प्रवास करणाºया प्रवाशांना २५० रुपये दंड आकारला जातो. तसेच ज्या रेल्वेगाडीमध्ये संबंधित प्रवासी प्रवास करत आहे, त्या गाडीने ज्या ठिकाणी प्रवाशाला जायचे आहे, ते भाडेही घेतले जाते. तसेच निश्चित केलेल्या वजनापेक्षा अधिक वजनाचे सामान घेऊन जाणाºया प्रवाशांकडून सहा पट अधिक दंड वसूल केला जातो. दंड न भरल्यास संबंधित प्रवाशांवर गुन्हाही दाखल केला जातो, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
रेल्वेच्या सव्वा लाख ‘फुकट्यां’कडून साडेसात कोटी वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 3:46 AM