पुणे : अनेक पालक आपल्या मुलाने आणखी चांगली कामगिरी करावी, यासाठी दुसऱ्या हुशार मुलांचे उदाहरण देत असतात. मात्र, हे करताना आपण आपल्याच मुलामध्ये न्युनगंड निर्माण करतोय, हे अनेकांच्या लक्षात येत नाही. जसे पालक आपल्या मुलांना उदाहरणे देतात. तशीच उदाहरणे शाळेतील शिक्षिका इतर मुलांना देत असतात. त्यांना रागवितात, त्यामुळे वर्गातील हुशार मुलावर खार खाऊन ७ जणांनी त्या मुलाला बेदम मारहाण करण्याचा प्रकार हडपसरमधील सय्यदनगर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नुकताच घडला आहे.
मुलाच्या वडिलांनी शाळा व्यवस्थापनाकडे याची तक्रार केली़ मात्र, शाळेने दिखाऊ कारवाई केल्याचे मत बनलेल्या वडिलांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. त्यानुसार ७ अल्पवयीन मुलांवर बेकायदा जमाव जमवून दंगा करुन मारहाण करुन दुखापत करणे अशा विविध गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सर्व ७ मुले साधारण १५ वर्षांची आहेत. हा मुलगा आठवीमध्ये सय्यदनगर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतो. तो शाळेत हुशार म्हणून गणला जातो. सर्व प्रश्नांची पटापट उत्तरे देतो. त्यामुळे वर्गशिक्षिका इतर मुलांना रागवत असत. त्यामुळे इतर मुले या हुशार मुलाचा राग धरुन होते. २२ नोव्हेंबरला मधल्या सुट्टीत या ७ मुलांनी या हुशार विद्यार्थ्याला घेरले. ‘‘तुझे सबकुछ कैसे आता है़, हर सवाल का जबाब तु क्यु देता है, तुम्हारे कारण टिचर हमे डाटते है’’ असे म्हणून त्यांनी त्याला शिवीगाळ केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
खिडकीचा पडदा काढून त्या पडद्यामध्ये त्याचे तोंड गुंडाळून पडद्याच्या पाईपाने त्याला बेदम मारहाण केली. शिवीगाळ करीत तुला गायबच करुन टाकतो, अशी धमकी दिली़ या घटनेत तो जखमी झाला. या प्रकाराची माहिती मिळाल्यावर मुलाच्या वडिलांनी शाळेच्या व्यवस्थापनाकडे तक्रार करुन त्या मुलांवर कारवाईची मागणी केली. शाळेच्या व्यवस्थापनाने या मुलांवर कारवाई केली असून त्यांचे समुपदेशन केल्याचे त्याच्या वडिलांना सांगितले़ मात्र, शाळेने केवळ कागदोपत्री कारवाई केली असे त्यांचे म्हणणे होते. शाळेच्या कारवाईने समाधान न झाल्याने त्यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ पोलिसांनी या मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. सी. जोगदंड तपास करीत आहेत.