पुणे : पुणे शहरात गाेवरचे ७ संशयित बालके आढळून आले असून त्यांना नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात रविवारी दाखल करण्यात आले आहे. त्यांना ताप व अंगावर पुरळ असे गाेवरचे लक्षणे असल्याने दाखल करण्यात आले असून त्यांचे नमुने तपासणीसाठी हाफकिन प्रयाेशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. सध्या ते संशयित असून नमुने आल्यानंतर त्यांना गाेवर आहे का नाही याचे निदान हाेणार आहे. त्यांचे नमून्यांचे अहवाल येण्यास १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे.
या संशयित बालकांचा वयाेगट हा ३ वर्षे ते १२ वर्षे इतका आहे. ते शहरातील रविवार पेठ, भवानी पेठेतील आहेत. तसेच त्यापैकी एकानेही गाेवरची लस घेतली नसल्याचे समाेर आले आहे. दरम्यान त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहीती महापालिकेचे लसीकरण अधिकारी डाॅ. सुर्यकांत देवकर यांनी दिली. त्यांची लक्षणे दुर झाल्यानंतर त्यांना घरी साेडण्यात येणार आहे.
आठ पाॅझिटिव्ह परंतू बरेही झाले
महापालिकेच्या आराेग्य विभागाने यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत २२६ गाेवर संशयित बालकांचे नमुने तपासणीला पाठवले हाेते. त्यापैकी आतापर्यंत ८ जण गाेवर पाॅझिटिव्ह आढळून आले हाेते. मात्र, ते रुग्ण ऑगस्ट ते सप्टेंबरमधील हाेते व त्यांचे अहवाल ३ डिसेंबरला आले. त्यामुळे ते सर्व रुग्ण बरे देखील हाेउन गेले आहेत. तसेच आता त्यांचा अहवाल आल्याने त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. अजुनही १०२ अहवाल पेंडिंग आहेत.
''मुंबईच्या धर्तीवर पुण्यात देखील आराेग्य विभागाने २८ तारखेपासून सर्वेक्षण सूरू केले आहे. त्यानुसार हाॅटस्पाॅट मधील १ लाख ६ हजार घरांचे सर्वेक्षण केले आहे. त्यापैकी ७७ बालके संशयित आढळले आहेत. त्यांचे नमुने तपासणीला पाठवले आहेत. सध्या ७ बालके असून ते बरे झाल्यावर घरी साेडण्यात येईल. - डाॅ. सुर्यकांत देवकर, लसीकरण विभाग प्रमुख''