पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने मराठी प्रेमी, साहित्यिक, कलाकार नेहमीच प्रयत्न करत असतात. परंतु मराठी भारतातील प्राचीन भाषांमधील एक भाषा असताना अद्याप हा दर्जा मिळू शकला नाही. यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून (मनविसे) उपक्रम राबविण्यात आला. पुण्यातील विविध शाळांमधील तब्बल सात हजार विद्यार्थ्यांकडून पंतप्रधानांना पत्र लिहीण्यात आले. त्यात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.
या उपक्रमामध्ये पुण्यातील विविध शाळांना सहभागी करुन घेण्यात आले. शाळांमधील मुलांनी मराठीत पत्र लिहून मराठीला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी केली. त्याचबराेबर सह्यांची माेहीम देखील राबविण्यात आली. याविषयी बाेलताना मनविसेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव म्हणाले, मनविसेकडून मराठी भाषा दिनानिमित्त सात हजार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना आम्ही पत्र लिहीत आहाेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध घटक प्रयत्न करत आहेत. या मागणीत विद्यार्थी देखील मागे नाहीत. म्हणून या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही ही पत्रे पाठवत आहाेत.