लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील गिरिप्रेमी संस्थेच्या सात महिलांनी लेहमधील कांग यात्से १ (६४०० मी.) आणि कांग यात्से २ (६२५० मी.) या शिखरांवर मोहीम आखली आहे. या मोहिमेसाठी ध्वजप्रधान कार्यक्रम नुकताच हनुमान टेकडीवर पार पडला.
गिरीप्रेमी संस्थेची स्थापना १९८२ साली झाली. या संस्थेच्या स्थापनेत उष:प्रभा पागे यांनी मोलाचा वाटा उचलला होता. संस्थेच्या अध्यक्ष असलेल्या पागे यांचा हिमालयीन मोहिमेसाठी सक्षम महिला संघ तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
हिमालयीन मोहिमांसाठी महिलांचा सक्षम संघ तयार करण्यासाठी गिरीप्रेमींचे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या मार्गदर्शनाखाली दीड वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध भागांतील १८ महिला गुरुकुल पद्धतीने तयारी करत आहेत. यातून लेहमधील कांगयात्से मोहिमेसाठी ७ महिलांचा संघ निवडण्यात आला. प्रियांका चिंचोरकरच्या नेतृत्वाखाली ही मोहीम जात असून त्यात स्नेहा गुडे, सायली बुधकर, अंजली कात्रे, पद्मजा धनवी, केतकी पाठक, स्मिता करिवडेकर यांचा समावेश आहे. या सर्वांच्या तंदुरुस्तीच्या दृष्टीने तयारी प्रशिक्षक समिरन कोल्हे यांनी करून घेतली. या महिला गिर्यारोहक संघाला मोहिमेचा ध्वज प्रदान करण्यात आला. यावेळी सरिता जोशी, मानसी पाठक, निखिल पाठक उपस्थित होते. त्यांनी संघाला शुभेच्छा दिल्या. निखिल पाठक यांनी संघाला आर्थिक पाठबळ दिले आहे. गिरिप्रेमी संस्थेचे आनंद पाळंदे, उष:प्रभा पागे, उमेश झिरपे, चंदन चव्हाण, श्रीपाद गोखले आणि एव्हरेस्ट शिखर वीर भूषण हर्षे, आनंद माळी व प्रसाद जोशीही यावेळी उपस्थित होते. १७ जुलै रोजी संघ पुण्यातून मोहिमेसाठी रवाना होणार आहे.
हिमभेगा, सोसाट्याच्या वाऱ्याचे आव्हान
कांग यात्से शिखरं ही लेहजवळील मारखा नावाच्या व्हॅलीमध्ये वसलेली आहेत. हा सगळा ‘हेमिस राष्ट्रीय उद्याना’चा भाग असल्यामुळे येथे जैवविविधता मुबलक प्रमाणात आहे. कांग यात्से १ शिखर चढाईमधील काही
आव्हाने म्हणजे अंगावरील चढाई, ७०हून अधिक कोनातील आईस वॉल, हिमभेगा, सोसाट्याचा वारा, लेहमधील हवेत
असलेला कोरडेपणा इ., तसेच कांग यात्से २ मोहिमेमध्ये समिट अटेंप्ट हा बेस कॅम्पवरून होत असल्यामुळे या
शिखरावर वेगळी आव्हाने आहेत.
फोटो आेळी :
१. माऊंट कांगयात्से १
२. माऊंट कांगयात्से २
३. ध्वजप्रदान कार्यक्रमावेळी हनुमान टेकडी येथे (डावीकडून) आनंद पाळंदे, प्रशिक्षक समीरन कोल्हे, स्नेहा गुडे, अंजली कात्रे, सरिता जोशी, मानसी पाठक, प्रियांका चिंचोरकर, उषःप्रभा पागे, पद्मजा धनवी, सायली बुधकर, केतकी पाठक, उमेश झिरपे उपस्थित होते.
फोटो - गिरीप्रेमी १, गिरीप्रेमी २, गिरीप्रेमी ३