नीलेश काण्णव
लोकमत न्यूज नेटवर्क
घोडेगाव : निसर्गाच्या कोपाने डोंगराचा कडा कोसळून जमिनीत गाडल्या गेलेल्या दुर्देवी माळीणच्या घटनेला उद्या शुक्रवारी (दि.३०) सात वर्षे पूर्ण होत आहेत. या दुर्घटनेत ४४ कुटुंबातील १५१ लोक दगावले. या घटनेच्यास्मृती लोकांमध्ये अजूनही ताज्या आहेत. यावर्षी माळीणप्रमाणे कोकणात तळीये गावात व इतर ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने माळीणकरांच्या त्या जखमा ताज्या झाल्या.
रात्रभर पडलेल्या पावसामुळे साचलेले पाणी डोंगराला पडलेल्या भेगांमध्ये साठून डोंगराचा कडा ३० जुलै २०१४ रोजी माळीण गावावर कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेने कोणालाही सावरण्याची संधीही मिळाली नाही. काही सेकंदात संपूर्ण गावच ढिगाऱ्यात गाडले गेले. ४० कुटुंबातील १५१ लोकांचा मृत्यू झाला. यातील ९ लोक जखमी झाले. तर ३८ लोक बाहेरगावी कामानिमित्त गेल्याने वाचले. शासकीय यंत्रणेने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या माध्यमातून आठ दिवस ढगाऱ्याचे खोदकाम केले व १५१ मृतदेह बाहेर काढले.
शासनाकडून मयतांच्या वारसांना प्रत्येक व्यक्तीमागे ८.५० लक्ष रुपये देण्यात आले. विविध योजनांमधून मदत करण्यात आली. दुर्घटना घडल्यानंतर अडीच वर्षांत कायमस्वरूपी पुनर्वसन करून देण्यात आले. या नवीन गावात ६८ घरे बांधण्यात आली असून सर्व १२ मूलभूत सेवासुविधा देण्यात आल्या आहेत.
नवीन माळीणचा अजूनही कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटला नाही. गावात सर्व सुखसोई झाल्या. परंतु, पिण्याच्या पिण्याचा सर्वांत मोठा प्रश्न सात वर्षे उलटूनही सुटलेला नाही. उर्वरीत सर्व लोकांना घरे मिळावीत, स्मृतिस्तंभावर सावलीसाठी पत्र्याचे शेड व्हावे, हनुमान मंदिरासमोर सभामंडप व्हावा, अशा मागण्या प्रलंबित आहेत.
कोट
नवीन गावठाणात पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. विहीर घेतली आहे. पण, तिला दिवाळीनंतर पाणी राहत नाही. जानेवारीनंतर आम्हाला टॅंकरने पाणी पुरवठा होतो. यासाठी बुब्रा नदीत झालेल्या बंधाऱ्यात पाणी साठले तर विहिरीला पाणी मिळेल. तसेच विहिरीचे खोलीकरण झाल्यास, टाकी भरेल एवढे पाणी साठेल. नवीन गावठाणात एवढी एकच समस्या राहिली आहे.
- शिवाजी लेंभे, दुर्घटनाग्रस्त
कोट
नवीन गावठाणात फारशा काही समस्या नाहीत. फक्त पाणी व लाईटची समस्या आहे. डीपीला एकही दिवा नाही व एकही फ्यूज नाही. यावर्षी कोरोनामुळे जुन्या माळीण गावात होणारा स्मृतिदिन कार्यक्रम आम्ही साध्या पद्धतीने करणार आहोत.
गोविंद झांजरे, ग्रामस्थ
कोट
‘जोडीदारामुळे मी वाचलो’, मंगलदास विरणकने याने मला नदीचं पाणी पाहण्यासाठी म्हणून गावाच्या बाहेर नेलं, पाणी पाहून शाळेजवळ येवून बसलो. माझ्यासमोर संपूर्ण गावावर डोंगर कोसळला. गाव गाडताना डोळ्यानं पाहिलं, मंगलदासनं पाणी पाहायला नेलं नसतं तर मी पण गाडलो गेलो असतो.
- कमाजी पोटे, ग्रामस्थ
कोट
गाव गेलं त्यावर्षी एवढा पाऊस पडला नाही एवढा पाऊस यावर्षी झाला आहे. मात्र गावात नुकसान काही झाले नाही. घर सुंदर झालीत. पण काही ठिकाणी गळतात. आम्हीच घरांवर वॉटरप्रुफिंग करून घेतले आहे. त्यामुळे गळती होत नाही.
-गोविंद बुधा झांजरे, ग्रामस्थ
कोट
अतिशय सुंदर व कमी वेळात माळीणचे पुनर्वसन झाले. माळीणकरांना कायमस्वरूपी पाणी मिळावे यासाठी दिलीप वळसे पाटील यांनी पायरडोह येथे मोठा तलाव बांधला आहे. या तलावातून माळीणला पाणी देण्याचे नियोजन असून यासाठी बुब्रा नदीवर बंधारेदेखील बांधण्यात आले आहेत.
- संजय गवारी, सभापती पंचायत समिती आंबेगाव
25072021-ॅँङ्म-ि06 - माळीण दुर्घटना
25072021-ॅँङ्म-ि07 - माळीण दुर्घटनेचे आत्ताचे ठिकाण
25072021-ॅँङ्म-ि08 - माळीणमधील घरे
25072021-ॅँङ्म-ि09 - माळीण दुर्घटनेत दगावलेल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात आलेला स्मृतिस्तंभ
25072021-ॅँङ्म-ि10 - गोविंद झांजरे
25072021-ॅँङ्म-ि11 - शिवाजी लेंभे
25072021-ॅँङ्म-ि12 - कमाजी पोटे