पुणे : पतीला दारुकरिता पैसे न दिल्याने पतीने रस्त्यावर पत्नीवर वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.के.मणेर यांनी सात वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त पाच महिने कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
इस्माईल बळीराम सूर्यवंशी ( वय 35, रा. पिंपरी) असे त्याचे नाव आहे. याबाबत त्याची जखमी पत्नी सुनीता ( वय 30) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 16 मे 2017 रोजी सकाळी 9.45 च्या सुमारास पिंपरी, मोरवाडी येथील अमृतेश्वर सोसायटीजवळ घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. ईस्माईल याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी दारू पिऊन सुनीता यांना मारहाण करत असत. घटनेच्या पूर्वी तो दोन दिवस घरी आला नव्हता. त्या कामाला चालल्या असताना रस्त्यात त्याने दारू पिण्यास पैसे मागितले. मात्र, पैसे देण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्याने गालावर आणि गळ्यावर ब्लेडने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यांनी स्वत:च्या हाताने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना नव-याने वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. तर, व्यक्ती स्वत: वर असे वार करणे शक्य नसल्याचा डॉक्टरांनी दिलेला जबाब अॅड. बोंबटकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. तसेच, त्याचा हेतू त्यांना जीवे ठार मारण्याचा होता. पूर्व तयारीते तो गुन्हा करण्यासाठी ब्लेड घेऊन गेला होता. त्याचे कृत्य समाजविरोधी आहे. त्याने असहाय्य पत्नीवर जीवेघेणा हल्ला केला आहे. त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली.