लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत बावीस हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांच्या बिलांचे ऑडिट करून तब्बल १७ कोटी ३४ लाख रुपये कमी केले आहेत. यापुढे सातत्याने तक्रार येणाऱ्या हाॅस्पिटलवर यापुढे गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.
कोरोनाकाळात रुग्णालयांनी आकारलेल्या अवास्तव बिलांच्याविरोधात संतापाची मोठी लाट उसळली होती. त्यानंतर खासगी रुग्णालये कोरोनाच्या काळात अवास्तव बिले आकारत असल्याचे लक्षात आल्यानंतर, राज्य सरकारने कोरोनावरच्या उपचारासाठी दर निश्चित केले होते. या दरांनुसारच सर्व रुग्णालयांनी उपचार करणे बंधनकारक होते. खासगी रुग्णालयांनी आकारलेल्या दीड लाखांहून अधिक रकमेच्या बिलांचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, “कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता वैद्यकीय बिलांचे लेखापरीक्षण करण्याची समिती यापुढेही कार्यरत राहील. गेल्या वर्षांपासून नियमित लेखा परीक्षण करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींकडून अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. रुग्णालयांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.”