पिरंगुट: मुळशी तालुक्यात पिरंगुट उरवडे येथील एसव्हीएस कंपनी मध्ये झालेल्या आग दुर्घटमध्ये १७ नागरिक मृत्युमुखी पडले. त्यांचे मृतदेह नातेवाइकांनी ससून हॉस्पिटलमधून ताब्यात घेतले असून या सतरा पैकी आठ मृतदेहांवरती पुणे येथील वैकुंठ स्मशान भूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. तर उर्वरित नऊ मृतदेह हे सोलापूर येथे तीन, अहमदनगर येथे दोन, उस्मानाबाद येथे एक, तुळजापूर येथे एक, संगमनेर येथे एक तर वैराग येथे एक हे त्या त्या गावातील त्यांचे नातेवाईक घेऊन गेले आहेत.
या सर्व प्रकरणांमध्ये अजित पवार यांनी मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने हे मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणामध्ये मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी विविध मागण्यासाठी ससून रुग्णालया बाहेर आंदोलन सुरू केले होते. परंतु या सर्व प्रकरणामधील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांच्या असणाऱ्या मुख्य चार मागण्यांवर पवार यांनी तातडीने आदेश काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ससून रुग्णालयासमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेत नातेवाईकांनी हे सर्व मृतदेह ताब्यात घेतले.
या होत्या नातेवाईकांच्या मुख्य मागण्या
मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन प्रत्येक मृतांच्या कुटुंबातील वारसांना पंचवीस लाख रुपये मिळावेत. तसेच त्यांच्या मुलांची आजीवन शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी. प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका नातेवाईकास कायमस्वरुपी नोकरी मिळावी. कंपनीला कायद्याचे उल्लंघन करून ज्या अधिकाऱ्यांनी विविध परवानग्या दिल्या आहेत त्या सर्वांना या प्रकरणात सहआरोपी करावे. या मुख्य मागण्या केल्या होत्या
यावेळी अजित पवार म्हणाले , कंपनीने मृतांच्या नातेवाईकांना जाहीर केलेली पाच लाखांची मदत कमी आहे. कंपनी व्यवस्थापन, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि नातेवाईक यांची तातडीने बैठक घेऊन या विषयावर तोडगा काढावा. व या आठवड्यामध्येच त्याचा अहवाल मला सादर करावा. या आदेशानंतर मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले.