बारामती: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना म्युकरमायकोसिसचे नवे संकट ओढवले आहे. वर्षभरात बारामतीत १७ तर सद्यस्थितीत जुन्नरमध्ये पहिला रुग्ण आढळून आला आहे. आता कोव्हीडनंतर उदभवणाऱ्या म्युकरमायकोसिसच्या (काळ्या बुरशी) आजाराच्या संसर्गाचे नवे संकट निर्माण झाले आहे.
कोरोनातून बरा झालेल्या व्यक्तींना या आजाराचा धोका संभावतो. ज्या रुग्णांना इंजेक्शन टॉसिलीझुमॅब, रेमडेसिविर इंजेक्शन दिले आहे. किंवा पाच दिवसांपेक्षा जास्त ऑक्सिजन दिला आहे, त्यांनाच नाकामध्ये म्युकरमायकोसिसची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे. वेळीच निदान न झाल्यास अथवा उपचार न मिळाल्यास हा आजार बळावत जातो. यातून रुग्णाचा जबडा किंवा डोळा काढावा लागू शकतो. प्रसंगी प्राणही गमवावा लागू शकतो. बारामतीत या रुग्णांचे प्रमाण हजारी तीन ते चार आहे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.
तर जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे म्युकॉरमायकॉसिस आजाराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. या महिला रुग्णाला पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. अशी माहिती संदीप डोळे यांनी दिली.
धनगरवाडी येथील एक ६५ वर्षीय महिला पुणे येथील समर्थ हॉस्पिटल येथे तीन आठवड्यापासून कोरोनावर उपचार घेत होती . पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. बरे वाटल्यानंतर रविवारी या महिलेस रुग्णालयातुन उपचार पूर्ण झाल्यानंतर सोडण्यात आले. महिला आपल्या मूळ गावी धनगरवाडी तालुका जुन्नर येथे आली. त्यानंतर रुग्णाचा डोळा लाल झाला, सुजला, डोळ्यातून पाणी येऊ लागले, ठणक चालू झाला. डोळ्याच्या तक्रारीनंतर महिलेला नारायणगाव येथील डॉ मनोहर डोळे मेडिकल फाऊंडेशनचे अथर्व नेत्रालय येथे तपासणीसाठी आणण्यात आले. तेथील नेत्रतज्ञ डॉक्टर अमित वानखेडे यांनी त्या महिला रुग्णाची डोळ्याची तपासणी केली असता त्यांना म्युकॉरमायकॉसिस या आजाराची लक्षणे दिसून आली म्हणून महिला रुग्णाला एमआरआय करण्यास सांगितला. एमआरआय च्या रिपोर्ट नुसार रुग्णास म्युकॉरमायकॉसिस हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डॉ संदीप डोळे व डॉ अमित वानखडे यांनी रुग्णास पुणे येथे प्रथम उपचार घेतलेल्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला.
अशी काळजी प्रथम घ्यावी
कोरोनाची लागण झाल्यानंतर तिसऱ्या व चौथ्या आठवड्यांमध्ये नाक नॉर्मल सलाइनने स्वच्छ करावे. रक्तातील साखरेचे प्रमाण १५ व्या व २२ व्या दिवशी तपासून पाहणे गरजेचे आहे . म्युकरमायकोसिस आहे की नाही हे पाहण्याकरिता नाकातील स्वॅब तपासून घ्यावा. म्युकरमायकोसिस हा आजार दुर्मिळ असला तरी नवा नाही. वेळीच तपासणी व उपचार केल्यास केल्यास ब्लॅक फंगसचा हा आजार बरा होऊ शकतो. यासाठी रुग्णांनी लक्षणे दिसताच डोळ्यांचे डॉक्टर किंवा कान, नाक व घसा तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे. असे उपजिल्हा रुग्णालय बारामतीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी सांगितले आहे.