पुणे : आईच्या मेंदूत अचानक रक्तस्त्राव झाला आणि तिला रूग्णालयात दाखल करावे लागले. त्यानंतर काही मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आणि सतरा वर्षीय मुलाला आपले अश्रू रोखता आले नाहीत. अगोदरच वडिलांचा आधार नव्हता, त्यात आता आईही सोडून गेल्याने छोट्या बहिणीसोबत जीवनाशी लढाई त्या सतरा वर्षीय सुमीत सळकेला करावी लागणार आहे. एवढा मोठा दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतर आपल्या आईचे अवयव दान करण्याचा धाडसी निर्णय घेत मनाचा मोठेपणा दाखविला आहे. एवढ्या लहान वयात त्याने खंबीर राहून हा निर्णय घेतल्यामुळे रूग्णालयातील उपस्थितांनी रांगेत उभे राहून त्याला सलाम केला. त्याच्या या निर्णयामुळे पाच रुग्णांना जीवदान मिळाले आहे.
खराडी येथील कोलंबिया एशिया रूग्णालयात गेल्या आठवड्यात सुरेखा सळके (वय ३७) यांना दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्या बेशुध्द पडल्या होत्या. त्यांना रूग्णालयात आणल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, उपचारांना काहीच प्रतिसाद येत नव्हता. त्यानंतर त्यांचा ब्रेड डेड झाला. या परिस्थितीत डॉक्टरांनी सुमीतला अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. अशा आभाळ कोसळलेल्या परिस्थितीत त्याने अवयवदानाचा निर्णय घेतला.त्याच्या वडिलांचे यापूर्वी एका अपघातात निधन झालेले. त्यामुळे आता फक्त तो आणि त्याची लहान बहिण घरात आहेत. आईने केलेल्या संस्कारामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले असून त्या मातेला उपस्थितांनी सलाम केला.हे अवयव ईएम रूग्णालयातील रूग्णाला लिव्हर, हृदय रूबी हॉल क्लिनिकला, एक किडनी वॉकखर्ड रूग्णालयाला (नाशिक), दुसरी किडनी कमांड हॉस्पिटलला आणि डोळ्यांचा कोर्णिया एचव्ही देसाई रूग्णालयातील रूग्णाला देण्यात आले आहेत.