पिंपरी : सातवीतील विद्यार्थ्याला एबीसीडी म्हणता येईना, महाराष्ट्र राज्य शब्द लिहिता येत नाही. धडाही अडखळत वाचतात, पाढे तोंडपाठ नाहीत...ही महापालिका शाळांतील विदारक स्थिती शुक्रवारी ‘लोकमत’ टीमने महापालिका शिक्षण मंडळ अधिकारी, पदाधिकारी यांना सोबत घेऊन उघडकीस आणली.शहरातील विविध शाळांना दुपारी चार ते साडेपाच या वेळेत अचानक भेटी दिल्या. वर्गावर्गात जाऊन विद्यार्थ्यांचे ज्ञान अजमवून घेतले. शिक्षकांची अवस्था केविलवाणी झाली.दफ्तरापासून बस प्रवासपर्यंत सर्व काही मोफत देण्यासाठी महापालिकेचा प्रचंड निधी खर्च होतो. सहाव्या वेतन आयोगानुसार प्रचंड पगार घेणाऱ्या शिक्षकांना मात्र विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सोयरसुतक नसल्याचेही चव्हाट्यावर आले. लोकमत टिमने शिक्षण मंडळ पदाधिकारी, अधिकारी यांच्यासमवेत दुपारी महापालिकेच्या शाळांना अचानक भेटी दिल्या. नेहरूनगरमधील एका शाळेत सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजीतील एबीसीडी सुद्धा लिहिता येत नसल्याचे निदर्शनास आले. तर तळवडेतील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी चक्क इंग्रजीत संभाषण केले. महापालिका शिक्षण मंडळाचे सभापति फजल शेख, उपसभापति सविता खुळे, सदस्य धनंजय भालेकर,सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंडे यांच्यासह लोकमतच्या प्रतिनिधींनी नेहरूनगर आणि तळवडेतील महापालिकेच्या शाळेला भेट दिली. कोणतीही पूर्वकल्पना न देता, अचानक दिलेल्या भेटीमुळे शैक्षणिक दर्जा तसेच शिक्षकांची कार्यपद्धती, शाळेचा परिसर, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती याबद्दलची वस्तुस्थिती निदर्शनास आली. नेहरूनगरच्या पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक विद्यालय मुले शाळा क्रमांक २ मध्ये शिकणारे विद्यार्थी अभ्यासात कच्चे असल्याचे दिसून आले. तर कै. किसनराव अंतुजी भालेकर प्राथमिक शाळा क्रमांक ९८ या शाळेतील विद्यार्थी अभ्यासात तसेच अन्य बाबतीतसुद्धा प्रगतीपथावर असल्याचे दिसून आले. दोन्ही महापालिकेच्या शाळा तरिही कमालीची विसंगती याचे शिक्षण मंडळ पदाधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटले. नेहरूनगरच्या शाळेत सातवीच्या वर्गास भेट दिली. पटसंख्या ३९ इतकी पण उपस्थित विद्यार्थी संख्या ३१ इतकी होती. एबीसीडी किती जणांना येते? असा पहिला प्रश्न विचारला. ३१ पैकी १५ विद्यार्थ्यांनी हात वर केले. त्यातही लिहिता येईल की नाही? याची शास्वती नसेलेले अनेकजण होते. त्यातील एकास फळयावर एबीसीडी लिहिण्यास सांगितले. त्याला क्रमानुसार एबीसीडी लिहिता आली नाही.त्याने जे हे अक्षर चक्क उलटे लिहिले. वर्गातील एकाही विद्यार्थ्यास सायन्सचे स्पेलिंग लिहिता आले नाही. इंग्लिश या शब्दाचे स्पेलिंग एका विद्यार्थ्याने बरोबर सांगितले. अन्य विद्यार्थ्यांना हेच विचारले असता, एकाने स्पेलिंग सांगितले असताना ते ऐकुनही कोणालाच ते पुन्हा सांगता आले नाही. त्याचवेळी गणिताचा तास सुरू होता. गणिताचे शिक्षक विजय ओताडी यांच्या समक्ष विद्यार्थ्यांना पाढे येतात का असे विचारले. निम्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पाढे येत नसल्याचे सांगितले. १२ च्या पुढील पाढे येणारा एकही विद्याथी आढळून आला नाही. एका विद्यार्थ्यास इंग्रजी पुस्तकातील पाठ वाचायला सांगितला.त्याने वाचन केले, मात्र तो अडखळत वाचत होता.एका विद्यार्थ्यास ‘महाराष्ट्र राज्य’ हा शब्द मराठीत लिहिण्यास सांगितला. एकाही विद्यार्थ्याला हा शब्द बरोबर लिहिता आला नाही.प्राचार्या मिनाक्षी रामगुडे आणि वर्ग शिक्षक ओताडी यांनी ‘‘आम्ही विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती व्हावी. यासाठी प्रयत्न करतो, परंतू पालकांनीही लक्ष दिले तरच त्यांच्यात सुधारणा घडून येईल.’’ असे नमूद केले.
सातवीच्या विद्यार्थ्यांना येत नाही ‘एबीसीडी’
By admin | Published: November 22, 2014 12:08 AM