पुणे : बागेत फिरायला जाणारे, ताणतणाव दूर करण्यासाठी हास्ययोग करणारे आणि चालण्याचा दैनंदिन व्यायाम करणारे अनेक ज्येष्ठ पुण्यात आहेत. मात्र, पर्वतीवर फिरायला जाण्यासोबतच ३० वर्षांत १७९७ वेळा ट्रेक सिंहगड सर करण्याचा संकल्प एका सत्तरीतील तरुणाने पूर्ण केला आहे. अवघ्या १ तास ४५ मिनिटांमध्ये सिंहगड चा १७९७ वा टप्पा पूर्ण करण्याचे धाडस या जिगरबाज तरुणाने केले आहे. सदाशिव पेठेत विजयानगर कॉलनी येथे राहणारे ज्येष्ठ नागरिक युवराज खाटपे यांचा सकाळी फिरायला जाणे, हा आवडता छंद. फेब्रुवारी १९८८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा सिंहगडाकडे कूच केली आणि उत्तम आरोग्य राखण्याचा संदेश देत त्यांनी आता १७९७ चा टप्पा पूर्ण केला आहे. त्याबद्दल त्यांचे मित्र पी. एम. जोशी, डॉ. संतोष कोठारी, जितेंद्र लडकत, गजाभाऊ कदम, मिशेल काकडे, सुनील बोडस, दिनेश महाजन यांनी खाटपे यांचा पुणेरी पगडी, उपरणे देऊन सन्मान करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दर गुरुवारी सिंहगड वारी करणारा हा ६९ वर्षांचा अवलिया पूर्वी अवघ्या ५० मिनिटांत ५ वेळा पर्वती चढण्या - उतरण्याचा व्यायाम करत होता. इतिहासाची पहिल्यापासून खाटपेंना आवड. त्यामुळे पुण्याजवळ असलेल्या सिंहगडाविषयी नेहमीच उत्सुकता. त्यामुळे पर्वतीनंतर हळूहळू सिंहगडावर जाण्यास त्यांनी सुरुवात केली. तेथेही पर्वतीप्रमाणे मित्रमंडळी जमले आणि त्यांची सिंहगडाची दर गुरुवार-रविवारची नित्याची वारी सुरू झाली. मोठ्या बांधवांनी प्रोत्साहन दिले. सिंहगडाला जाण्यात खंड पडू नये, यासाठी मोबंधू सुभाष खाटपे यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे जितेंद्र लडकत , डॉ. संतोष कोठारी, विनय कुलकर्णी, पी.एम.जोशी, वसंत सुरुडकर, आणि सिंहगड वारकरी संघ असा मित्रमंडळींचा कट्टा सिंहगडावर जाण्यासाठी दर गुरुवार व रविवारी जमत होता. पहाटे ४ वाजता पुण्यातून निघायचे. सकाळी ५ वाजता गडाच्या पायथ्याशी पोहचत सिंहगडावर चढण्यास सुरुवात करत असत. ४सिंहगड ट्रेक करण्यासोबतच खाटपे यांनी गोवा, मिझोरम, उटी, हिमालय, राजस्थान यांसारख्या अनेक ठिकाणी ट्रेक केले आहेत. तर कात्रज ते सिंहगड ट्रेक त्यांनी तब्बल ६ वेळा पूर्ण केला आहे. प्रत्येक ठिकाणी गेल्यावर ते तरुणांना आरोग्य संवर्धनासाठी प्रोत्साहीत करतात.
सत्तरीतील तरुणाची १७९७ वेळा सिंहगडवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 2:24 PM
पुणे : फेब्रुवारी १९८८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा सिंहगडाकडे कूच केली. उत्तम आरोग्य राखण्याचा संदेश देत त्यांनी आता १७९७ चा टप्पा पूर्ण केला आहे.
ठळक मुद्देदर गुरुवारी सिंहगड वारी करणारा हा ६९ वर्षांचा अवलिया पूर्वी अवघ्या ५० मिनिटांत ५ वेळा पर्वती चढण्या - उतरण्याचा व्यायाम करत होता. ४सिंहगड ट्रेक करण्यासोबतच खाटपे यांनी गोवा, मिझोरम, उटी, हिमालय, राजस्थान यांसारख्या अनेक ठिकाणी ट्रेक केले प्रत्येक ठिकाणी गेल्यावर ते तरुणांना आरोग्य संवर्धनासाठी प्रोत्साहीत करतात.