नारायण बडगुजर
पिंपरी : बलात्कार, लैंगिक अत्याचार, विनयभंग असे गुन्हे दररोज दाखल केले जात आहेत. मात्र पिंपरी-चिंचवड शहरात एक अजब प्रकरण पोलिसांच्या समोर आले आहे. यात ७० वर्षीय वृद्ध महिलेने ८५ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीच्या विरोधात कैफियत मांडली आहे. संबंधित व्यक्तीचे आणि आपले संबंध होते. त्यातून मुले जन्माला आली. त्यांची डीएनए टेस्ट केल्यास हा म्हाताराच त्या मुलांचा बाप असल्याचे सिद्ध होईल, असे म्हणून वृद्ध महिलेने पोलिसांकडे मदत मागितली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पश्चिम महाराष्ट्रातील एका गावातील पहिलवान असलेला एक रांगडा तरुण पिंपरी-चिंचवड शहरात नोकरीनिमित्त आला. शहरातील एका खासगी कंपनीत त्याने नोकरी केली. दरम्यान, आजारामुळे त्याच्या पत्नीचे निधन झाले. त्यामुळे त्याने पत्नीच्या बहिणीसोबत लग्न केले. दुसऱ्या पत्नीसोबत संसार सुखात सुरू होता. दोन्ही पत्नीपासून त्याला सात -आठ मुले झाली. दरम्यान त्याचे एका तरुणीसोबत विवाहबाह्य संबंध जुळले. त्यातूनही त्यांना मुले झाली. त्यानंतर कालपरत्वे पहिलवान कंपनीतून सेवानिवृत्त झाला. तोपर्यंत त्याच्या मुलांची लग्ने होऊन नातवंडे देखील मोठी झाली होती. विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेची मुलेही मोठी झाली. त्यांचीही लग्ने झाली.
दोघांच्या प्रेमात वयाचा अडसर झाला. शरीर साथ देत नाही म्हणून भेटीगाठी कमी झाल्या. दरम्यान पहिलवान हा वयोवृद्ध झाला. तर त्याचे संबंध असलेली महिला देखील वृद्धावस्थेत आली. त्यामुळे दोघांचेही स्वकमाईचे मार्ग बंद झाले. दरम्यान वृद्ध पहिलवानाची दुसरी पत्नी देखील मयत झाली. त्यानंतर त्याने घर, फ्लॅट आदी सर्व मिळकत मुलांच्या नावावर करून दिली. मात्र वृद्ध महिला आर्थिक अडचणीत आली. त्यामुळे ४० वर्षांपूर्वीच्या प्रेमाची तिला आठवण झाली. हृदयाच्या एका कोपऱ्यात बंदिस्त असलेल्या आठवणींनी उचल खाल्ली आणि वृद्ध महिलेने तडक पोलिसांकडे धाव घेतली.
पोलीसही चक्रावले
वृद्ध महिलेने पोलीस ठाणे गाठले. पहिलवान असलेल्या व्यक्तीचे आणि माझे ४० वर्षांपूर्वी संबंध होते. त्यातून आम्हाला मुले झाली आहेत. तुम्हाला पुरावा पाहिजे असल्यास माझ्या मुलांची आणि त्या म्हाताऱ्याची डीएनए टेस्ट करा, ती त्याचीच मुले असल्याचे त्यातून लगेच सिद्ध होईल, असे वृद्ध महिलेने सांगितले. तसेच वृद्ध व्यक्तीने आपल्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणीही महिलेने केली. त्यामुळे पोलीस चक्रावले. नेमके काय करावे, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.
‘डीएनए टेस्टची गरज काय? ती माझीच मुले आहेत’
वृद्ध महिलेच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी संबंधित वृद्ध व्यक्तीशी संपर्क साधला. मी आता उतारवयात असून, मधुमेह, उच्चदाब आदी आजारांनी त्रस्त्र आहे. त्यामुळे मी अंथरुणाला खिळून असतो. माझ्या औषधोपचारासाठी माझी चारही मुले प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे मला दरमहिन्याला खर्च देतात. या महिलेच्या म्हणण्यानुसार मी कोणतीही आर्थिक मदत तिला करू शकत नाही. तसेच तिच्या मुलांचा बाप मी आहे, हे सिद्ध करण्यासाठी डीएनए टेस्ट करण्याची गरज काय? मी त्या मुलांचा जन्मादाता असल्याचे मान्य करतो. त्यांनी बाप म्हणून माझा स्वीकार करून माझा सांभाळ करावा. तसेच माझ्या औषधोपचाराचाही खर्च करावा, असे संबंधित वृद्ध व्यक्तीने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांपुढील पेच आणखी वाढला.