पुणे : सध्या शहरामध्ये कडाक्याची थंडी पडत असून, किमान तापमान ८ अंशावर पोचले आहे. थंडीची लाट येणार असल्याने हा पारा अजून खाली घसरू शकतो. तसेच कारण या थंडीमुळे अनेकजण आजारी पडत असून, सर्दी, पडसे, ताप, श्वसनविकार, सांधेदुखी, पाठदुखीचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे पुणेकरांनीआरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले.
दिवाळीमध्ये अजिबात थंडी जाणवली नाही. त्यावेळी थंडी कधी पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण आता गेल्या आठवड्यापासून पुण्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. हिवाळ्यातील हवा थंड आणि कोरडी असल्याने नागरिकांची प्रतिकारशक्ती देखील कमकुवत होत आहे. त्यामुळे श्वसनविकारांसह विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ होत असल्याची माहिती आरोग्यतज्ज्ञांनी दिली आहे. सर्वांनी काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
हिवाळ्यात दिवस छोटा आणि रात्र मोठी असते. त्यामुळे नागरिकांचा सूर्यप्रकाशात राहण्याचा वेळ कमी झालेला असतो. वातावरण थंड असते. त्यातून शरीरातील ‘ड’ जीवनसत्वाची पातळी कमी झालेली असते. त्यामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होते. थंडी वाढल्यावर नागरिक अधिक काळ घरामध्येच थांबतात. परिणामी घरातील सदस्यांमध्ये जंतूसंसर्ग वेगाने पसरण्याचा धोका असतो. यामुळे ताप, सांधेदुखी, सर्दी-पडसे अशा तक्रारी सुरू होतात. या तक्रारी टाळण्यासाठी बदलत्या हवामानानुसार आहार आणि जीवनशैलीत बदल करणे अत्यंत आवश्यक असते, असे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले आहे.
थंडीमुळे कोणता त्रास ?
– सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास– दमा, ॲलर्जी आणि श्वसनविकार– सांधेदुखी होते, आर्थराइटिसचा त्रास– रक्तवाहिन्यांचे आकुंचन, रक्तदाब वाढ– ऊन कमी अंगावर घेतल्याने ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता
काय काळजी घ्याल ?
- थंडी असली तरी व्यायाम सुरू ठेवा- किमान सूर्यनमस्कार करणे आवश्यक– थंडीपासून बचावासाठी वापरा उबदार कपडे– शक्यतो ‘एसी’चा वापर टाळावा– सूर्यप्रकाशात अधिक वेळ थांबा– त्रास होत असेल तर डॉक्टरांना दाखवा