- रविकिरण सासवडे बारामती : बारामती तालुक्याच्या जिरायती भागामध्ये भीषण दुष्काळाची चाहूल लागली आहे. सलग ६व्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने खरिपाबरोबर रब्बीच्यादेखील आशा शेतकºयांनी सोडून दिल्या आहेत. दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे.बारामतीचा जिरायती पट्टा अवर्षणप्रवण क्षेत्रात येत असल्याने या भागात पावसाचे प्रमाण अल्प असते. परतीच्या पावसाने साथ दिली तरच जिरायती भागातील शेती व अर्थकारण सुरळीत राहते. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत बारामती तालुक्यात सरासरीच्या केवळ ५१ टक्केच पाऊस झाला. तहसील कार्यालयाकडे या वर्षी केवळ २२१ मि.मी. पावसाची नोंद आहे. अत्यल्प पावसामुळे जिरायती भागातील खरीप हंमाग पूर्णपणे वाया गेला. मोरगाव, तरडोली, मुर्टी, जोगवडी, लोणी भापकर, माळवाडी, जळगाव आदी भाग रब्बी हंगामातील मालदांडी ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, यंदाही या भागात पाऊस न पडल्याने खरिपातील पेरणी वाया गेली. तर, परतीच्या पावसानेदेखील पाठ फिरविल्याने रब्बीच्या आशादेखील मावळल्या. शेतीच्या पाण्यापेक्षा आता जिरायती भागाला पिण्याच्या पाण्याची चिंता लागून राहिली आहे.खडकवासला धरणातून जानाई-शिरसाई योजनेसाठी वरवंड व शिर्सुफळ येथील तलावात पाणी सोडण्याची मागणी जिरायती भागातील नेत्यांनी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी घेतलेल्या दुष्काळ आढावा बैठकीत केली होती. तालुक्यातील काºहाटी, बाबुर्डी, माळवाडी, फोंडवाडा, देऊळगाव रसाळ, जळगाव क.प., जळगाव सुपे या गावांमध्ये लोकांना प्यायला पाणी नाही. सध्या खडकवासला कालव्याचे इंदापूर तालुक्यासाठी आवर्तन सुरू आहे. या आवर्तनामधूनच या दोन तलावांमध्ये पाणी सोडले, तर पुढील काही महिने जिरायती भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.तसेच, जिरायती भागातील ८० टक्के शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. शेतीला पूरक असणारा हा व्यवसाय जिरायती भागात मात्र शेतकºयांचा प्रमुख व्यवसाय झाला आहे. मात्र, जनावरांचा चारा महागला आहे. बागायती पट्ट्यातून येणाºया उसाला ३ हजार ५०० ते ४ हजार टन एवढा दर आला आहे. तर, मका आणि कडवळ यांचे दरदेखील गगनाला भिडले आहेत. प्रतिगुंठा १ हजार २०० ते १ हजार ३०० असा दर आहे. शेतात काही पिकलेच नसल्याने जनावरांचा चारा विकत घ्यावा लागतो. मात्र, खिशात पैसे नसल्याने सर्वसामान्य शेतकºयांना चारा विकत घेणे परवडत नाही. परिणामी, जनावरांच्या कुपोषणाचाही धोका वाढत आहे. त्यामुळे जिरायती भागात तातडीने चारा डेपो सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जिरायती भागातील सुपे, लोणी भापकर, उंडवडी या मंडळामध्ये भीषण चाराटंचाई जाणवू लागली आहे.दुष्काळ निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ज्या भागात पाणीटंचाई आहे, तेथे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. चारा डेपोसाठी सध्या तरी मागणीचे प्रस्ताव किंवा निवेदन प्राप्त झालेले नाही. चाराटंचाईचीदेखील माहिती घेतलीजात आहे.- हनुमंत पाटील, तहसीलदार, बारामती तालुकाजानाई-शिरसाईच्या पाण्यासाठी खडकवासल्याचे कार्यकारी अभियंता चोपडे यांच्याकडे मागणी केली आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. जर खडकवासल्याचे पाणी मिळाले, तर जिरायती भागाला मोठा दिलासा मिळेल.- संजय भोसले, सभापती, पंचायत समिती बारामतीतालुक्यात सध्या ६ टँकरच्या साह्याने पानसरेवाडी, काºहाटी, सोनवडी सुपे, मुर्टी, तरडोली, देऊळगाव रसाळ, मोराळवाडी आदी ६ गावे व ४७ वाड्यावस्त्यांतील १३ हजार ९४१ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर जळगाव सुपे, भिलारवाडी, काळखैरेवाडी, कारखेल आदी गावांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच गाडीखेल, वढाणे, बाबुर्डी यांचे टँकर मागणीचे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत.- प्रमोद काळे, गटविकास अधिकारी बारामती पंचायत समितीबारामती तालाुक्यात ८८ हजार २५३ मोठी जनावरे, तर १ लाख ५३ हजार ६९८ शेळ्या-मेंढ्या आहेत. या प्रमाणे २ लाख ४१ हजार ९५१ पशुधन बारामती तालुक्यामध्ये आहे. या पशुधनाला दिवसाला ७८३ मेट्रिक टन चारा व २० लाख ४३ हजार ३१० लिटर पाण्याची गरज आहे. जिरायती भागात जनावरांचे प्रमाण जास्त आहे. - डॉ. रमेश ओव्हाळ, तालुका पशुवैद्यकीय अधिकारीसध्या एकूण तालुक्यात ऊस वगळता ६० हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. आगामी काळात शेतकºयांच्या अडचणींमध्ये भर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
बारामतीत भीषण दुष्काळाची चाहूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 2:19 AM