भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील श्रीक्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथील वन उद्यानात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत असून नवीन केलेली लागवड नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पाणी नसल्याने येथील वन्यजीवांना मानवी वस्तीचा आधार घ्यावा लागतो. यामुळे मोकाट कुत्र्यांपासून धोका निर्माण झाला आहे.संपूर्ण राज्यात एक जागृत देवस्थान म्हणून नावारूपाला आलेल्या श्रीक्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथील वन विभाग तीव्र पाणीटंचाईचा सामना करीत आहे. पुरंदर तालुक्यात खरीप हंगामात पावसाने हुलकावणी दिली. आता रब्बी हंगाम आला तरी पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. यामुळे या भागाची पाण्याची पातळी अतिशय खोलवर गेली आहे. भुलेश्वर वन उद्यानात गेल्या ५ वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाते.पाऊस असो वा नसो, वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वृक्षलागवड केली जाते. मात्र, सुरुवातीपासून पाऊसच नसल्याने ही लागवड अडचणीत आली आहे. वन विभागाच्या हद्दीतील जुनी विहीर दुरुस्त करून त्यातील गाळ काढण्यात आला आहे. वन्यजीव त्यामध्ये पडू नये, म्हणून त्या विहिरीला कठडा (संरक्षक भिंत) बांधण्यात आला आहे. एवढा खर्च करूनही ही विहीर पाण्याअभावी कोरडी आहे. माळशिरस ग्रामस्थ व वन विभाग पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी वन विभागात कसे आणता येईल, यासाठी प्रयत्न करतात. तसे या ठिकाणी गेल्या वर्षी पाणी आणून झाडे जगवण्याचा प्रयत्नही केला. यंदा मात्र तसे करणे शक्य झाले नाही. यामुळे पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. या ठिकाणी एक बोरवेल घेतलेली आहे तिला थोडेफार पाणीही आहे. या पाण्याचा पाणवठे भरण्यासाठी वापर केला जातो. मात्र, या पाण्यापासून वन्यप्राण्यांची पुरेशी तहान भागत नाही.
भुलेश्वर वन उद्यानात पाण्याची तीव्र टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 2:17 AM