इंदापूर : तालुक्यात सध्या २८ गावे, २८२ वाड्या-वस्त्यांवर ५४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. केवळ १३ दिवसांत तालुक्यातील टँकरची संख्या १४ ने वाढली आहे. अधिकची नऊ गावे, ७६ वाड्या-वस्त्या पाणीटंचाईच्या विळख्यात सापडल्या आहेत, तर पाणी टँकरवर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या १५ हजार ७१४ ने वाढली आहे.
मार्च महिन्यात आठ टँकरने पाणीपुरवठा होत होता. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तालुक्यात प्रकर्षाने पाणीटंचाई जाणवू लागली होती. ५ मेपासून टँकरची संख्या ३२ ने वाढली. १९ गावे व त्या खालील २०६ वाड्या-वस्त्यांवर ४० टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. ७३ हजार ४८० लोक, ३१ हजार ४५४ गायी म्हशींसारखी दुभती जनावरे व ३५ हजार ११९ शेळ्या-मेंढ्यांवर टँकरच्या पाण्याने तहान भागविण्याची वेळ आली होती. दि. १८ मेपासून वायसेवाडी व त्याखालील सहा वाड्या-वस्त्या, अकोले गावठाण व त्याखालील आठ वाड्या, म्हसोबाची वाडी गावठाण व त्याखालील आठ वाड्या, भांडगाव गावठाण व त्याखालील दोन वाड्या, वडापुरी गावठाण व त्याखालील सहा वाड्या-वस्त्या, कचरवाडी ( निमगाव केतकी) गावठाण व त्याखालील दोन वाड्या, रेडणी व त्याखालील २२ वाड्या, गोखळी व त्याखालील १९ वाड्या, सराटी गावठाण व त्याखालील एक वाडी, अशी ९ गावे, ७६ वाड्या-वस्त्या टंचाईच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. आजघडीला एकूण २८ गावे, २८२ वाड्या-वस्त्या, त्यामध्ये असणारे ८९ हजार १९४ लोक टँकरच्या पाण्यावर अवलंबून असल्याचे चित्र आहे.