कान्हूरमेसाई: येथील सार्वजनिक विहिरीच्या ५०० मीटर अंतरावर काही जणांनी अनधिकृत बाेअरवेल घेतले आहे. त्यामुळे विहिरीतील पाणी पातळीत घट होत असून वाड्या वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली असल्याने यावर उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, तहसीलदार लैला शेख यांनी या अनधिकृत बोअरवेलवर कारवाईचे निर्देश महावितरणला दिले आहे.
कान्हूरमेसाईसह परिसरातील वाड्या-वस्त्यांना सार्वजनिक विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. ग्रामपंचायतीने टंचाई निधीमधून हिवरे येथून पाईपलाईनने पाणी आणून ते सार्वजनिक विहिरीत सोडले जाते. आणि हा पाणी पुरवठा होता. मात्र, काही जणांनी विहिरीच्या ५०० मीटर अंतरावर बोअरवेल घेतले आहे. अनधिकृत कनेक्शनद्वारे शेतीला पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे काही दिवसांपासून हा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सध्या तर या विहिरीच्या पाणीपातळीत घट झाली असून ग्रामस्थांना पाण्याची तीव्र टंचाई होत असल्याचे सरपंच चंद्रभागा खर्डे यांनी सांगितले .
दरम्यान, यासंदर्भात ग्रामपंचायतीने तहसीलदार लैला शेख यांना वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर शेख यांनी या अनधिकृत बोअरवेलवर कारवाईचे निर्देश महावितरणला दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर गट विकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी बोअरवेल धारकांना नोटीस बजावल्या आहेत.
०७ कान्हूरमेसाई
विहिरीजवळील बोअरवेलची पाहणी करताना विजयासिंह नलावडे, के. बी घासले व ग्रामस्थ.