पिंपरी : ओळखीचा फायदा घेऊन महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिच्या १७ वर्षीय मुलीशी गैरवर्तन केले. तसेच मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दबाव आणला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. हा प्रकार मागील सहा महिन्यांपासून सुरू होता. याप्रकरणी ४० वर्षीय पीडितेने गुरुवारी (दि. २) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून सद्दाम उर्फ उजाला जमसेद (वय ३५ रा. पिंपरी गाव) याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत कोणाला सांगितले तर पीडितेच्या मुलांना मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच पीडितेच्या १७ वर्षीय मुलीशी गैरवर्तन करत तिच्याशी लग्न लावून देण्याबाबत दबाव आणला. लग्न नाही लावले तर पीडितेचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या दोन्ही मुलांना रस्त्यात अडवून मारहाण करून दोघांना गायब करण्याची धमकी दिली. आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या मुलीचे फोटो व अश्लिल कॉल रेकॉर्डींग व्हायरल केले, असे फिर्यादीत नमूद आहे.