पुणे: पुण्यातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षका विरुद्ध अनैसर्गिक अत्याचार करत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका ३३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या पुण्यातच पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. खडकी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2013 पासून वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हरीश सुभाष ठाकूर (वय 40) असे गुन्हा दाखल झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. ते बंडगार्डन पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपीने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे. अशी खोटी माहिती देऊन फिर्यादी सोबत विवाह केला. त्यानंतर फिर्यादीचा सतत शारीरिक व मानसिक छळ करून विवाहबाह्य संबंध ठेवले. आरोपीने पाच वर्षीय मुलासमोर फिर्यादी सोबत वारंवार अनैसर्गिक संबंध ठेवले. २०१५ मध्ये नवी मुंबई येथील घरी असताना फिर्यादीला ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या वर गोळी झाडली. ही गोळी फिर्यादीच्या डाव्या हाताच्या बोटाला लागली असून त्या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी गुन्हा देखील दाखल आहे असे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
इतके दिवस आरोपीच्या दबावामुळे फिर्यादीने तक्रार दिली नव्हती. परंतु आरोपीने लग्नाची नोंदणी करण्यास टाळाटाळ केली विश्वासघात केल्याने फिर्यादीने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.