पुणे : कोरोनाच्या खडतर काळात शं. ल. चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून दररोज ३०० लोकांना मोफत जेवण देत आहे. खेड-शिवापूर दर्गा येथील वस्ती, तसेच अनेक बेघर लोकांना अन्नदान केले जात आहे. यासाठी बचत गटाच्या महिलांना काम दिले जात असून, दररोज पंचवीस महिला कोरोना काळात घालून दिलेल्या सरकारी नियमांचे काटेकोर पालन करीत हे काम करीत असल्याचे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. गिरिजा भास्कर शिंदे यांनी कळविले आहे.
प्रतिष्ठान तर्फे महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याच्या दृष्टीने मोफत प्रशिक्षण वर्गदेखील घेण्यात येत आहेत. जेणे करून महिलांना घर बसल्या व्यवसाय सुरू करता येईल. या मध्ये सर्व प्रकारचे मसाले, इन्स्टंट पीठे, कागदी पिशव्या, विविध प्रकारचे आयुर्वेदिक तेल, वाळवणीचे पदार्थ, बाळंतविडा, गोधडी, इमिटेशन ज्वेलरी, बाग आणि सेंद्रिय खतनिर्मिती, विविध प्रकारची कलाकौशल्य, रुखवत, बालवाडी प्रशिक्षण, अंगणवाडी प्रशिक्षण, डेंटल डॉक्टर असिस्टंट प्रशिक्षण, नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षण, वृद्ध सेवा प्रशिक्षण असे अनेक प्रशिक्षण वर्ग घेऊन महिलांना रोजगार मिळवून दिला जात आहे. कागदी पिशव्यांच्या प्रशिक्षणामुळे महिलांना कायमस्वरूपी काम मिळाले असून, विविध आकर्षक गोधडी प्रशिक्षणामुळे महिलांनी बनवलेल्या गोधड्यांना दुबईची बाजारपेठ मिळाल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.