पिंपरी : न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत बांधकामांवर बुधवारपासून महापालिका प्रशासन कारवाई करण्यावर ठाम असल्याचे आयुक्त राजीव जाधव यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, दुसरीकडे शासन व न्यायालयाकडून याबाबत काही आदेश येतोय का, याची वाट प्रशासन पाहत आहेत. मात्र, अद्यापही महापालिकेला कोणताही आदेश आलेला नाही. त्यामुळे कारवाईची तयारी महापालिकेने केली आहे. कारवाई सुरू होण्याआधी राज्य शासन सकारात्मक निर्णय घेऊन दिलासा देईल, अशी अपेक्षा अनधिकृत बांधकामधारकांना लागलेली आहे. शहरात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी शहरात फ ौजफ ाटा तैनात ठेवला आहे.अनधिकृत बांधकामे नियमित करू, असे आश्वासन काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारने दिले होते. आघाडी सरकारच्या कालखंडात या प्रश्नाबाबत निर्णय झाला नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने आमचे सरकार सत्तेवर आल्यावर प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले होते. युतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधकामे नियमित करण्याला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही बांधकामे पडू न देण्याचे आश्वासन दिले. सीताराम कुंटे समितीचा अहवालही शासनाच्या समित्यांनी मंजूर केला आहे. याबाबतचे सरकारने पत्र दिले नाही. हा अहवाल प्राप्त होईल त्यामुळे अनधिकृत बांधकामे वाचतील अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु त्यावर पाणी फिरले आहे.(प्रतिनिधी)
आशेच्या किरणांवर बुलडोझरची छाया
By admin | Published: April 01, 2015 5:01 AM