प्रशांत ननवरे
बारामती: नीट(युजी)—२०२३ मधुन होणाऱ्या राज्याच्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया नोंदणीमध्ये सावळा गोंधळ सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थी पालक प्रचंड धास्तावलेले आहेत. यापुर्वी एवढा ढिसाळ कारभार कधीही नसल्याबाबत बारामती येथील प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक अभियंता हेमचंद्र शिंदे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमत्र्यांसह वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवत लक्ष वेधले आहे. हया मधील सावळा गोंधळ थांबवून प्रवेश प्रक्रिया सुरुळीत राबविण्यासाठी शिंदे यांनी सर्वांना साकडे घातले आहे.
नीट(युजी)—२०२३ मधुनमधून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (एमयुएचएस) नाशिक अंतर्गत राज्यातील आरोग्य विज्ञान शाखेतील शासकीय व खासगी संस्थामधील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस व इतर शाखांची प्रवेश प्रक्रिया राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तां तर्फे राबविण्यात येत आहे. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांकडून आॅनलाईन नाव नोंदणी ( करणेबाबतची नोटीस दिनांक २३ जुलै नुसार रजिस्ट्रेशन कालावधी २३ ते २९ जुलै सात दिवस ) आहे. प्रत्यक्षात २३ जुलै ची नोटीस २४ जुलै रोजी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली. २४ जुलै रोजी दुपारपर्यंत नाव नोंदणीसाठी लिंक ही उपलब्ध नव्हती. संध्याकाळपर्यंत लिंक उपलब्ध झाली. परंतु अनेक मेनू उघडत नव्हते. तीच परिस्थिती २५ जुलै रोजी होती. मंगळवारी (दि २६) सकाळी रजिस्ट्रेशन साठी दोन लिंक व पेमेंट साठी एक लिंक स्वतंत्र देण्यात आल्या. तोही प्रयोग नंतर फसला. आज दुपारी तीन पर्यंत फक्त एक लिंक ठेवली. ती सुध्या बंद होती. थोडक्यात वेळापत्रकानुसार कागदावर रजिस्ट्रेशन साठी सात दिवस दाखवले गेलेत.प्रत्यक्षात चार दिवस झाले असूनही रजिस्ट्रेशन व्यवस्थित होतच नाही.
मग उर्वरित तीन दिवसांमध्ये फॉर्म भरून होणार का? याबाबत विद्यार्थी पालक प्रचंड धास्तावलेले आहेत. कागदावर मात्र सर्व व्यवस्थित व वेळेत चालू आहे असे दाखविले जात आहे. वास्तविक पाहता देशभरातील कर्नाटक, तेलंगणा, आंध्रसह अनेक राज्यांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया कागदपत्र तपासणी सह यापूर्वीच संपलेली आहे. राज्याच्या यंत्रणेने मात्र नीट निकालानंतर काहीही केले नाही. सीईटी सेलने कागदपत्र तपासणी केली नाही. माहितीपत्रक दिले नाही, अपलोड करावयाच्या कागदपत्रांचे नियम व नमुने (उदाहरणार्थ डिफेन्स, डोंगरी प्रदेश, एम के बी, मेडिकल फिटनेस ) सुद्धा उपलब्ध करून न देता रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू केली.मागील वर्षी वैद्यकीय प्रवेशासाठी राज्यातून ८० हजार विद्यार्थी पात्र होते. यंदा मात्र एक लक्ष ३१ हजार विद्यार्थी पात्र आहेत. विद्यार्थी संख्या वाढलेली आहे याची माहिती असूनही वेळीच दोन आठवड्यापूर्वीच रजिस्ट्रेशन सुरू करणे गरजेचे होते. आता कमीतकमी त्वरित संकेतस्थळ सुधारावे , एकही विद्यार्थी रजिस्ट्रेशन पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी,अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.
रजिस्ट्रेशन साठी आपण मुदतवाढ देऊ शकत नाही याचीही गंभीरपणे नोंद घ्यावी. कारण देशभरातील प्रवेश प्रक्रियेचे जे वेळापत्रक आहे त्यानुसार सद्यस्थितीत सीईटी सेलकडे वेळ नाही (४ सप्टेंबर पर्यंत पहिली फेरी घेणे बंधनकारक आहे) म्हणून संकेतस्थळ त्वरित सुधारणे हा एकच पर्याय उपलब्ध आहे. आपण आयुक्त, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांना आदेश द्यावेत अशी माझी आपणास राज्यातील असंख्य विद्यार्थी पालकांच्या वतीने नम्रतेची विनंती असल्याचे अभियंता शिंदे यांनी पत्रात नमुद केले आहे.