शिवानी खोरगडे
पुणे : विद्येचं माहेरघर पुणे. पण या माहेरघरात रस्त्यावर, फुटपाथवर राहणाऱ्या लहान मुलांसाठी जागा नाहीये. म्हणूनच प्रिया सारख्या समाजसेवकांना पुढं यावं लागतं. जबाबदारी उचलावी लागते. झोपडपट्टी तसंच फुटपाथवर राहणारे नागरिक, ज्यांच्याकडे काहीही कागदपत्रे नाहीत, अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय? हा प्रश्न नेहेमी उपस्थित केला जातो. अशा मुलांसाठी पुण्यातल्या तृतीयपंथी अमित मोहिते यांनी पुढाकार घेतलाय. गेल्या वर्षभरापासून अमित या मुलांना शिकवत आहेत.
पुणे शहरात मालधक्का चौक जवळच्या पुणे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या राजीव गांधी मार्गावर ही शाळा चालते. या फुटपाथवर जवळपास तीस झोपड्या आहेत. अंदाजे दीडशे लोक फुटपाथवर झोपडी टाकून राहतात. या झोपड्यामधले नागरिक तसंच लहान मुलं रस्त्यावर फुगे, खेळणी विकतात तर कधी भीक मागतात. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अमित मोहिते यांनी 'सावली' संस्था स्थापन करून फुटपाथवरच मागच्या वर्षी शाळा सुरू केली. पुण्यात फुटपाथवर 'सावली शाळा' भरत आहे. तृतीयपंथी अमित मोहिते यांच्या पुढाकाराने सोमवार ते शुक्रवार दररोज २ तास शाळा चालते.
सध्या अमितलाही फुटपाथवर शाळा भरवताना अनेक अडचणी येताहेत. समाजातून पुरेशी मदत मिळावी म्हणून धडपड सुरुये. शिवाय स्वतःच्या अस्तित्वाची लढाईही अमित एकट्यानंच लढतोय.