रामबाग येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू आहे. मात्र, लसीकरणाचा सावळा गोंधळ असून, नागरिक सकाळी ६ वाजल्यापासून प्रतीक्षेमध्ये असतात. येथील कर्मचारी, होमगार्ड, पोलीस ९.४५ वाजता हजर होतात. तर आरोग्य कर्मचारी ९.३० वाजता येतात. येथे काम करणारे शासकीय कर्मचारी सोडून इतर नागरिक लसीकरणासाठीच्या चिट्या वाटतात. लसी अपुऱ्या असल्याने अनेकांना लसी न घेताच रिकाम्या हाताने परत जावे लागते. लसीकरणासाठी होणाऱ्या गर्दीमुळे संसर्ग वाढण्याची भीती येथील नागरिक व्यक्त करतात. डोस उपलब्ध नसल्याने नागरिकांना लस न घेताच जावे लागत आहे. यात वृद्ध नागरिकांचे हाल होत आहेत.
भोर शहराची लोकसंख्या सुमारे १८ हजार असून, भोर शहरातील नागरिकांसाठी दररोज १०० ते २०० लसीचे डोसच उपलब्ध असतात. ते पुरेसे नाहीत. त्यामुळे डोस कमी आणि नागरिक अधिक अशी अवस्था रोज होते. भोर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भोर नगरपलिकेत किंवा शाळेत लोकांच्या सोयीनुसार लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी अनेक महिन्यांपासून नागरिक करीत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या आढावा बैठकीत माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी शहरात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. प्रशासनाने भोर शहरात मध्यवर्ती ठिकाणी लवकरात लवकर लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कुलकर्णी यांनी केली आहे.
भोर शहरासह ग्रामीण भागातही अशीच आवस्था
भोर शहरातील लसीकरण केंद्र लांब असून, डोसचा पुरवठा अपुऱ्या होत आहे. यामुळे अनेकांना लस मिळतच नाही. काहीशी अशीच आवस्था ग्रामीण भागातील नेरे, आंबवडे, हिर्डोशी, नसरापूर, जोगवडी, भोंगवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आहे.
अनेकांना पहिला डोस देऊन ८४ दिवस झाले तरी अद्याप दुसरा डोस मिळालेला नाही. अनेकांना मेसेज येत नाहीत. आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ सुरू आहे.
भोर येथील उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर झालेली गर्दी.