पुणे: पर्यावरणास घातक असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी) पासून बनविलेल्या मूर्तीवर न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे अद्याप गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे पीओपीला पर्याय म्हणून शाडू माती, कागद, तसेच इतर पर्यायांचा वापर करावा, अशा सूचना महापालिकेने मूर्तिकारांना दिल्या आहेत.
पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२० मध्ये मूर्ती बनविणारे कारागीर आणि उत्पादकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहे.मात्र, गेल्या चार वर्षांत गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी याबाबतचे आदेश काढले जात असल्याने तोपर्यंत वेळ निघून जाते. त्यामुळे महापालिकेने यंदा नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच शहरातील मूर्तिकारांची बैठक घेत या निर्णयाची माहिती दिली. शहरातील २५ ते ३० मूर्तिकार या बैठकीस उपस्थित होते.या वेळी त्यांच्याही अडचणी महापालिकेने ऐकून घेऊन त्या सोडविण्याचे आश्वासनही दिल्याचे पर्यावरण विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांनी सांगितले.
मार्गदर्शक सुचना मध्ये केवळ जैवविघटनशील पर्यावरणास अनुकूल अशा शाडू माती, चिकणमाती वापरून बनवलेल्या कच्च्या मालापासून मूर्ती तयार करणे. अजैविक कच्चा माल, तसेच प्लास्टर ऑफ पॅरीस, प्लॅस्टिक आणि थर्माकोल चा वापर न करणे. मूर्तींचे दागिने बनविण्यासाठी फक्त वाळलेल्या फुलांपासून बनवलेले साहित्य, पेंढा इत्यादींचा वापर करावा आणि मूर्ती आकर्षक बनविण्यासाठी झाडांची नैसर्गिक उत्पादने चमकदार सामग्री म्हणून वापर करावा. मूर्ती रंगविण्यासाठी पर्यावरणास अनुकूल वॉटर कलर्स, जैवविघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक रंगाचा वापर करावा. विषारी आणि अविघटनशील रासायनिक रंग, ऑइल पेंट्स, इनॅमल आणि कृत्रिम रंगावर आधारित पेंटस वापररू नयेत याचा यामध्ये समावेश आहे.