पुणे : मार्केट यार्ड परिसरात दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
शाहरुख ऊर्फ चांग्या मेहबूब खान (वय २६, रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड सध्या रा. अशरफनगर, कोंढवा) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. शाहरुख खान याने त्यांच्या साथीदारांसह मार्केट यार्ड परिसरात तलवार, चॉपर, लाकडी बांबू यांसारखी हत्यारे बाळगून अपहरण, दुखापत करणे, जबरी चोरी, घरफोडी, चोरी असे गुन्हे केले आहेत. मागील ६ वर्षांत त्यांच्याविरुद्ध ८ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल, या भीतीने नागरिक उघडपणे त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यास धजावत नव्हते. सध्या तो कोंढवा येथे राहायला गेला असून तेथेही त्याची गुन्हेगारी कृत्ये सुरू होती.
मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे व पोलीस निरीक्षक सुविता ढमढेरे यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना सादर केला होता. त्यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून शाहरुख खान याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कडक पावले उचलली असून, गेल्या ७ महिन्यांत २० सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.