पुणे : ‘जवान शहीद झाल्यानंतर समाजाच्या विविध स्तरांतून पाठिंबा, आधार मिळतो. कृतज्ञतेच्या भावनेतून अनेकजण पाठीशी उभे राहतात. परंतु, आयुष्याच्या अखेरपर्यंत स्वाभिमानाने जगण्यासाठी वीरपत्नींनी स्वावलंबी बनले पाहिजे. स्वाती महाडिक, गौरी महाडिक या तरुणी पती शहीद झाल्यानंतर प्रशिक्षण घेऊन सैन्यात दाखल झाल्या, ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे’, असे प्रतिपादन ब्रिगेडियर (निवृत्त) रघुनाथ जठार यांनी केले. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर त्या कुटुंबावर कोसळलेल्या दु:खाचे सांत्वन आपण शब्दांत करू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.जागतिक महिला दिनानिमित्त जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेतर्फे पुणे जिल्ह्यातील वीरमाता, वीरपत्नी आणि वीरपित्यांचा सन्मान करण्यात आला. देशाच्या सीमेवर संरक्षण करताना वीरमरण आलेल्या सैनिकाप्रती व त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून हा सोहळा आयोजिला होता. काही दिवसांपूर्वीच शहीद झालेल्या मेजर शशिधरन नायर यांच्या पत्नी तृप्ती नायर, अबोली मोहोरकर, सोनाली सौरभ फराटे, भारत-चीन युद्धापासून आपल्या पतीच्या प्रतीक्षेत असलेल्या मालती जगताप यांच्यासह एकूण ५५ वीरमाता-वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला. विजयकुमार मर्लेचा यांनी आपल्या मातोश्री कांताबाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मानचिन्हे दिली.अश्वमेध सभागृहात झालेल्या या सोहळ्याला जिल्हा सैनिक बोर्डाचे मेजर (निवृत्त) मिलिंद तुंगार, कॅप्टन (निवृत्त) सुरेश जाधव, अॅड. इंद्रजितसिंग गिल, वीरपत्नी अबोली मोहोरकर, वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, कार्यकर्त्या मीनाक्षी नवले, देवयानी गोंगले, चैत्राली वाघ आदी उपस्थित होते. देशभक्तीपर गीतांची धून, शहीद जवानांविषयीच्या आठवणी यामुळे सभागृह भारावून गेले होते.गौरी कुलकर्णी व मंजिरी तिक्का यांनी शहिदांच्या कुटुंबीयांसाठी गायन सादर केले. श्रीराम ओक यांनी निवेदन केले. मीनाताई कुर्लेकर यांनी आभार मानले.ग्रामीणमधील हुताम्यांच्या कुटुंबीयांसाठी काम...अबोली मोहोरकर म्हणाल्या, ‘सैनिकांविषयीच्या माहितीचा अभाव अजूनही समाजात दिसतो. आर्थिक मदतीची, सहानुभूतीची आम्हाला गरज नसते. परंतु, आपलेपणाच्या भावनेने बोलणारी आणि सोबत राहणारी माणसे हवी असतात. ग्रामीण भागातील शहिदांच्या पत्नी, त्यांची मुले यांच्यासाठी काम करण्याची गरज आहे. ’कुर्लेकर म्हणाल्या, ‘देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांबरोबर काम करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. यापुढे ज्या शहिदांच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही, अशांसाठी संस्था मदत करेल.’
शहिदांच्या कुटुंबीयांनी स्वावलंबी व्हावे - ब्रिगेडियर रघुनाथ जठार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 3:31 AM