मोहन शेटे : हिंदू साम्राज्य दिनानिमित्त पोवाडे व व्याख्यान
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पोवाडे ऐकून गावातील लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये पराक्रम जागृत झाला. शिवरायांच्या सैन्यात तरुण दाखल होत होते, ही शक्ती पोवाडा आणि शाहिरी कलेची आहे. मरगळलेल्या समाजात शाहिरीमुळे पुन्हा चैतन्य निर्माण होते. त्यामुळे पोवाडा आणि शाहिरी कलेच्या उगमाची गंगोत्री शिवकाळातील आहे, असे मत इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी व्यक्त केले.
कसबा गणपती वस्ती अंतर्गत शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने लालमहाल येथे हिंदू साम्राज्य दिन अर्थात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला रा.स्व.संघाचे कसबा नगर संघचालक बाळासाहेब पाटोळे, कसबा गणपती वस्तीप्रमुख भरत हजारे, प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच आशिष शहा, अश्विनीकुमार उपाध्ये, नगरसेवक योगेश समेळ, प्रा. संगीता मावळे हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शाहीर गणेश टोकेकर व सहकाऱ्यांनी श्री शिवराज्याभिषेक पोवाड्याचे सादरीकरण केले. कोरोना प्रतिबंधासाठी असणाऱ्या सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शेटे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते, तर पाकिस्तानच्या सीमा तुमच्या-आमच्या घरापर्यंत आल्या असत्या. त्यामुळे आपल्या या राजाने आपल्यावर जे उपकार केले आहेत, त्याचे स्मरण करायला हवे. शिवरायांचे तेज, शौर्य, पराक्रम, सामर्थ्य आणि परखड वृत्ती आम्हाला द्या म्हणजे एक दिवस आपल्या देशाला जगाच्या पहिल्या क्रमांकावर आम्ही नेऊन ठेवू अशी शपथ आपण घेऊ या.”
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. त्यासाठी त्यांनी त्यांच्या दिलेल्या सूचना, शिस्त मावळ्यांनी पाळली नसती, तर हे स्वराज्य उभे राहिले नसते. महाराजांनी सांगितलेल्या काही गुणांचा तरी आपण अवलंब केला पाहिजे.”
शाहीर होनराज मावळे यांनी सूत्रसंचालन केले. अरुणकुमार बाभूळगावकर यांनी आभार मानले.