युगंधर ताजणे पुणे : आता गावाला काय परिस्थिती आहे याची कल्पना मित्र फोनवरुन देतात. गावातील लोकांच्या हाताला काम नाही. दिवसभर एखाद्या पारावर बसून असतात. गप्पांमध्ये वेळ वाया घालवतात. येथे महाराष्ट्रात लॉकडाऊन असला तरी कामाला तुटवडा नाही. सुतारकाम, रंगकाम सुरु आहे. चार दोन पैसे गाठीशी येतात. त्यामुळे गावाला जाऊन करणार काय? बिहार आणि युपीपेक्षा महाराष्ट्र सरसच आहे. माणूस उपाशी राहत नाही.त्याला दोन वेळचे अन्न मिळते. या शब्दांत परप्रांतीय विजेंद्र याने आपल्या भावना व्यक्त केल्या. उत्तर प्रदेशातील आणि गोरखपूर गावात राहणारा विजय सोळा वर्षांचा असताना पुण्यात आला. सध्या तो हडपसर येथे विकास यादव याच्या समवेत राहतो. सुतारकाम, रंगकामाचे काम हे दोघेजण करतात. सध्या मोठ्या संख्येने परप्रांतीयांना त्यांच्या गावी पाठविले जात आहे. कोरोनाचे वाढणारे संकट पाहता विजेंद्रने सुरुवातीला गावी जाण्याचा निर्णय घेतला. फॉर्म भरुन, आरोग्य तपासणी करुन गावी जाण्याची तयारी सुरु केली. ज्यादिवशी गावाला जायचे त्यावेळी रेल्वे स्थानकावर गेला. मात्र अचानक काय डोक्यात आले अन तो पुन्हा माघारी फिरला. गावाला जाऊन करणार काय? हजारोच्या संख्येने सर्वजण गावाला चालले आहे. अशावेळी तिथे देखील राहण्याचा, जेवणाचा आणि रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर काम शोधण्यासाठी संघर्ष करावा लागेल. तेव्हा काम मिळवणे आव्हानात्मक असल्याने सध्या आहे त्याठिकाणी राहणे शहाणपणाचे ठरेल. असा विचार विजेंद्रने केला. त्याने गावी जाण्याचा निर्णय रद्द केला. उत्तरप्रदेश, बिहार, या राज्यांतून आलेले मोठे कामगार हडपसर, मुंढवा, घोरपडी, उंड्री,कोंढवा, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, या भागात आहेत. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाला आहे. इमारतीची कामे, रंगकाम, सुतारकाम हे कामगार करतात. यातील 4 हजारांपेक्षा अधिक कामगार आता आपआपल्या गावी परतले आहेत. मात्र अनेक कामगार अजूनही आपल्या गावी जाण्यास तयार नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे याठिकाणी मिळणारा मुबलक पैसा आणि दोन वेळचे जेवण हे असल्याचे विजेंद्र याने सांगितले. चार मुलांचा बाप असणाऱ्या विजेंद्रला लॉकडाऊनच्या काळात काम करुन पैसा कमवायचा आहे. हे पैसे कमवून पुढे कोरोनामुक्त दिवाळी साजरी करायची आहे. सध्या गावाला पैसे पाठवून फोनवरुन त्यांची खुशाली विचारतो. आता गावाला गेल्यावर पुन्हा त्यांच्याकरिता अडचण होण्यापेक्षा पुण्यातच थांबलेले केव्हाही चांगले. असे त्याचे म्हणणे आहे. जितकी मदत महाराष्ट्रातून केली जात आहे त्या तुलनेने ती बिहार आणि युपीतून होत नसल्याचे तो सांगतो. आता एका लेबर कँम्पमध्ये राहणाऱ्या विजेंद्रला आसपासच्या सोसायटीतील नागरिक जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करतात. जेवण देतात. सध्या गँसला पैसे नसल्याने तो आणि त्याचा मित्र चुलीवर भात शिजवून खातात.
* यहाँ से जाने का मन नही करता....पुने से अभी बडा लगाव बन गया है, इस शहरसे बाहर जाने जा मन नही करता असे म्हणत विकास आपले पुण्याबद्द्लचे प्रेम व्यक्त करतो. गेल्या अनेक वर्षांपासून बेकारी, गरिबी आणि बेरोजगारी या प्रश्नांनी ग्रासलेल्या बिहार आणि उत्तरप्रदेशातील परिस्थिती बिकट आहे. आपण तिथे जाऊन आणखी त्यात भर टाकण्यापेक्षा येथे राहून काम करणे अधिक महत्वाचे वाटते. माणूसकीचा आगळावेगळा प्रत्यय येथे पाहायला मिळतो. पुण्यात भरपूर काम आहे. ते सोडून गावी जाण्याचा विचार नसल्याचे विकासने सांगितले.