लोणी कंद/कोरेगाव भीमा : छत्रपती श्री शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा हा क्रांती, शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असून, हा सोहळा फक्त महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित न राहता तो देशभर पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असून, तुळापूरला येणाऱ्या रस्त्यावर संभाजीराजांच्या नावाची कमान लावण्यासाठी आपण १० लाख रुपयांचा निधी देत असल्याची घोषणा खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली. श्री क्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे छत्रपती शंभूराजांचा ३४० वा शंभूराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. राज्यभरातून या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने शंभूभक्त उपस्थित होते. स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार नीतेश राणे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, शिरूर-हवेलीचे आमदार अॅड. अशोक पवार, आमदार महेश लांडगे, आमदार सुनील टिंगरे, आमदार राजूभय्या नवघरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाऊसाहेब शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद, माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यासह सरपंच रूपेश शिवले, उपसरपंच राहुल राऊत आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी मोठ्या संख्येने शंभूभक्त उपस्थित होते. खासदार संभाजीराजे भोसले म्हणाले की, शंभूराजांच्या पराक्रमाइतकाच त्यांचा त्यागही मोठा आहे. ग्रंथलेखन उल्लेखनीय, जिजाऊंच्या संस्कार व स्फूर्तीमुळेच शंभूराजे घडले. शंभूराजांचे बलिदान देश व जगभरात पोहचवायच्या हेतूने राज्याभिषेक सोहळा उपयुक्त ठरणार आहे. खासदार निधीतून दहा लाख रुपयांची देणगी पुणे-नगर मार्गावरील कमानीसाठी देताना आणखी काही मदत लागेल, ती करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. सध्या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेचे हनन झाल्याचीही खंत व्यक्त करून गोयल लिखित मोदींवरील पुस्तक प्रकरण, खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरही थेट टीका केली.आमदार नीतेश राणे यांनीही राऊत यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. आमच्या नादी लागू नका, अन्यथा शिवशंभूप्रेमी त्यांना चोख उत्तर देतील, असे आव्हान देत अशा प्रसंगी कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यांचीही ग्वाही दिली. तर, मृणाल कुलकर्णी यांनीही जिजाऊ, तसेच राजांचे आदर्श विचार व मूल्ये नव्या पिढीला जीवनात उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. अॅड. अशोक पवार यांनी परिसराच्या विकासाचा आढावा घेत राजांचे कार्य, पुरस्कारार्थींचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात प्रदीप कंद यांनी सोहळा समितीचे अध्यक्षपद दिल्याने जबाबदारी वाढल्याचे सांगत यापुढील काळात हा सोहळा अधिक व्यापक करणार असल्याचे सांगितले. आयोजक शेखर पाटील यांनी प्रास्ताविकात संभाजीराजे घराघरांत पोहोचावेत, यासाठी सोहळ्याचे आयोजन केल्याचे सांगितले.या सोहळ्यात सह्याद्रीच्या दºया-खोºयात फिरून २ महिन्यांत २०० किल्ले सर केलेले, मूळचे बेल्जियमचे असलेले पिटर व्हॅन गेट यांना ‘शंभूगौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. या वेळी विविध मान्यवरांना गौरविण्यात आले. यामध्ये जिजाऊ गौरव पुरस्कार-अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, समाज गौरव पुरस्कार - रामकृष्ण सातव पाटील, शंभूगौरव पुरस्कार - शंकरराव बोरकर, बहुजन नायक पुरस्कार - पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे तसेच लोणी कंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, अॅड. शंकरमहाराज शेवाळे, संभाजी पाटील, स्वामीराज भिसे, गणेश कुटे, जयंत पाटील, शशिकांत मोरे, संभाजी आहेरराव, विष्णू सालपे, शिवज्ञा व्हेंचर्स, तेजस्विनी सामाजिक संस्था, संभाजी पाटील, जय शंभूराजे मित्र परिवार आदींनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर पोलीस उपनिरीक्षक पडळकर, बाळासाहेब गाडेकर, ग्रामविकास अधिकारी ज्योत्स्ना बगाटे आदींचा सन्मान झाला. आयोजन व नियोजन शंभूराज्याभिषेक सोहळा समिती तुळापूर-पुणे, समस्त ग्रामस्थ तुळापूर, ग्रामपंचायत तुळापूर यांच्या वतीने केले. प्रास्ताविक सरपंच रूपेश शिवले यांनी केले. सूत्रसंचालन क्रांती कराळे यांनी, तर आभार अमोल शिवले व राहुल राऊत यांनी मानले. ........दोनशे किल्ले सर करणारा परदेशी तुळापुरात नतमस्तक४मूळचे बेल्जियमचे असलेले पिटर व्हॅन गेट या परदेशी नागरिकाने सह्याद्रीच्या दºयाखोºयांत फिरून २ महिन्यांत २०० किल्ले सर केल्याने त्यांना ‘शंभूगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. या वेळी मराठीत ऋण व्यक्त करीत येथील सुवर्णक्षणाचे अनुभव आपल्या देशात अभिमानाने सांगणार असल्याचे सांगितले...........तुळापूरच्या विकासासाठी २० लाख४छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ असलेल्या श्री क्षेत्र तुळापूर (ता. हवेली) हे ऐतिहासिक स्थान असून, येथील विकासासाठी आमचेही योगदान आवश्यक असल्याने खासदार छत्रपती श्री संभाजीराजे भोसले यांनी दहा लाखांची मदत जाहीर केली. तसेच, महाराष्ट्र शासनाकडून निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे संभाजीराजेंनी या वेळी सांगितले. तसेच, सत्यजित तांबे यांनीही या वेळी तुळापूरच्या विकासासाठी दहा लाखांची मदत केली.
आकाशी भगवे झेंडे, हाती मशाली...मुखी शंभू छत्रपतींचा जयजयकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 1:51 PM
शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा हा क्रांती, शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक...
ठळक मुद्देतुळापूरला लोटला जनसागर : छत्रपती शंभूराजांचा ३४० वा शंभूराज्याभिषेक सोहळा उत्साहाततुळापूर रस्त्यावर संभाजीराजांच्या नावाची कमान लावण्यासाठी आपण १० लाख रुपयांचा निधी