Pune Drugs Case News: पुण्यातून कोट्यवधींचे ड्रग्स पकडले गेले असताना आता थेट सर्रासपणे विक्री करतानाचा धक्कादायक प्रकार समोर आला. फर्ग्युसन रस्त्यावरील एका नामांकित हॉटलेमधून सर्रास ड्रग्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या पार्टीमध्ये काही तरुण बाथरूम मध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले. यावरून आरोप-प्रत्यारोप होत असून, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली असून, मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले.
पुण्यात कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पब, हॉटेल आणि बारवर पोलीस कारवाई सुरु झाली होती. एफसी रोडवरील एका पबमधील व्हिडिओमुळे पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारा वेळ हा मध्यरात्री दीड नंतरचा असल्यामुळे पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाचे नियम धुडकावून पहाटे पाचपर्यंत पब सुरू असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलिस करत आहेत. फर्ग्युसन रस्त्यावरील द लिक्वीड लिझर लाऊंज उर्फ एल३ हा पब पहाटे पाचपर्यंत सुरू होता, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकरांकडून मोठे आरोप
एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधील व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या प्रकारावरून राजपूत नावाच्या अधिकाऱ्याला महिन्याला तीन कोटी रुपये मिळतात, ते मंत्र्यांना पोहचात. तो हप्ता शंभूराज देसाई यांना जातो, असा मोठा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. तसेच पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावर आम्ही तब्बल आठ ते नऊ महिन्यापासून सातत्याने भूमिका मांडत आहोत. जेव्हा कोट्यवधींचे ड्रग्जचे साठे सापडले होते. तेव्हाही आम्ही शंभुराजे देसाई आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारले होते. शंभूराज देसाई यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. शंभूराज देसाई यांच्यासाठी करणारे उत्पादन शुल्कचे अधिकारी राजपूत यांचेही निलंबन झाले पाहिजे. हे झाल्याशिवाय पुणे सुधारणार नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
शंभुराज देसाई यांनी दिले प्रत्युत्तर
सुषमा अंधारेंनी आम्ही काय म्हणत आहे ते घेतले पाहिजे. हा व्हिडिओ आताच पहिला. याची चौकशी आम्ही करू. रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे. गेल्या महिन्याभरात आपण पुण्यात ४९ हॉटेल आणि बारवर कारवाई केली आहे. तसेच पुण्यात सरप्राईज चेकिंग सुरु करण्यात आले आहे. या प्रकारची गंभीर दखल घेऊन चौकशी करणार आहे. तेथील क्षेत्रीय अधिकाऱ्याचीही चौकशी करणार आहोत. कुठल्याही अधिकाऱ्याबरोबर सरकारचे साटेलोटे नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. जो अधिकारी यात दोषी आढळेल, त्यावर कारवाई केली जाईल, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले.