भिगवण : पुणे शहरासह मावळ विभागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने खडकवासला धरणासह सर्व धरणे भरली; मात्र इंदापूर तालुक्यातील तलाव अद्यापही कोरडेच असल्याने शेतीसह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पण, गेल्या पाच वर्षांपासून मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी तलाव कोरडे पडले आहेत. वेळोवेळी पाणी सोडण्याची मागणी करूनही तलावात पाणी सोडले जात नसल्याने बुधवारी (दि. २९) शेतकºयांनी तलावात बोंबाबोंब आंदोलन करून सरकार आणि जलसंपदा विभागाच्या विरोधात घोषणा देऊन मुंडण करून निषेध केला.
गेल्या ५ वर्षांपासून मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी हे तलाव कोरडेठाक पडले आहेत. मागील काळात पाऊस कमीझाल्याने दुष्काळ पडला होता. याही वर्षी या भागात पाऊस कमी झाला आहे; पण पुणे भागातील धरण साखळीत पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे. पाऊस सुरू असताना या शासनाने नदीद्वारे पाणी खाली सोडून वाया घालवले. पण, हेच वाया जाणारे पाणी कॅनॉलद्वारेसोडून मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी तलाव भरून घेतले असते, तर या भागातील सिद्धेश्वर निंबोडी, मदनवाडी, पिंपळे, शेटफळगढे, पोंधवडी, भादलवाडी, स्वामी चिंचोली, पारवडी या लहान खेड्यांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली नसती, अशी खंत या वेळी आंदोलक शेतकºयांनी व्यक्त केली.अनेक वेळा या भागातील नागरिकांनी या तिन्ही तलावांत पाणी सोडण्याची मागणी करूनही त्याकडे डोळेझाक केल्याचा आरोप कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक रंगनाथ देवकाते यांनी केला. या वेळी गणपत ढवळे, गणेश साळुंके, सूरज बंडगर, आबासाहेब बंडगर, राजेंद्र धुमाळ, बबलू भोसले आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दौंड तालुक्यातील तलाव प्रत्येक पाळीला भरून घेतले जात असताना आकसापोटी इंदापूर तालुक्यातील काही तलाव, ज्यावर राजकीय नेत्यांची शेती सिंचनाखाली नाही, ते जाणूनबुजून पाटबंधारे खात्याकडून कोरडे ठेवले जात आहेत. तर, आमदार आणि माजी मंत्री याकडे गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही, अशी तक्रार शेतकरी करीत आहेत.